रांची : वृत्तसंस्था
मागील अनेक वर्षे भारतीय क्रिकेटचा आयकॉन म्हणून ओळखल्या जाणार्या महेंद्रसिंह धोनीने भारताच्या सर्वांत यशस्वी कर्णधारांत मानाचे स्थान पटकावले आहे. त्याने अविश्वसनीय कामगिरी करून झारखंड राज्याला आंतरराष्ट्रीय क्रिकेटच्या नकाशावर वेगळी ओळख दिली. त्याच्या या कीर्तीचा गौरव म्हणून झारखंड राज्य क्रिकेट असोसिएशनने येथील स्टेडियममधील एका स्टॅण्डला कॅप्टन कूल धोनीचे नाव दिले आहे. या स्टेडियममधील दक्षिण स्टॅण्ड आता ‘एमएस धोनी पॅव्हेलियन’ म्हणून ओळखला जाणार आहे. धोनीने 2004मध्ये बांगलादेशविरुद्ध आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण केले, पण त्याचा हा प्रवास सोपा नक्कीच नव्हता. अनेक अडचणींवर मात करत, संघर्ष करीत धोनीने भारतीय संघात स्वतःचे अढळ स्थान निर्माण केले. आजच्या घडीला रांचीचा हा सुपुत्र आंतरराष्ट्रीय क्रिकेटमधील सर्वांत यशस्वी खेळाडू आहे. त्याच्या नेतृत्वाखाली भारतीय संघाने 2007मध्ये ट्वेन्टी-20 वर्ल्ड कप जिंकला आणि त्यानंतर धोनीतील नेतृत्वगुणाची सर्वांनी दखल घेतली. भारतीय संघाच्या तीनही संघांचे कर्णधारपद धोनीकडे आले आणि 2011मध्ये भारताने वन डे वर्ल्ड कप जिंकला. 1983 सालानंतर तब्बल 28 वर्षांनी भारताने वर्ल्ड कप जिंकला तो धोनीच्या नेतृत्वाखाली. त्याने भारताला जागतिक कसोटी क्रमवारीत अव्वल स्थान मिळवून दिले आणि आशिया चषक व चॅम्पियन्स ट्रॉफीही धोनीच्याच नेतृत्वाखाली भारताने उचलली. आयसीसीच्या तीनही प्रमुख स्पर्धा जिंकणारा तो पहिला कर्णधार ठरला आणि आतापर्यंत एकाही कर्णधाराला त्याच्या या विक्रमाशी बरोबरी करता आली नाही. धोनीच्या याच अविश्वसनीय कामगिरीचा गौरव म्हणून झारखंड क्रिकेट असोसिएशनने स्टेडियममधील एका स्टॅण्डला धोनीचे नाव देण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबतची अधिकृत घोषणा अद्याप झाली नाही. भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील तिसरा वन डे सामना 8 मार्चला रांचीत होणार आहे आणि त्या वेळी ही घोषणा करण्यात येईल.
RamPrahar – The Panvel Daily Paper