विविध मागण्यांसाठी साकडे; घोषणांनी परिसर दणाणला
अलिबाग : प्रतिनिधी
अंगणवाडी कर्मचार्यांना कायम शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, त्यांचे मानधन वाढविण्यात यावे आदी विविध मागण्यांसाठी महाराष्ट्र राज्य अंगणवाडी कर्मचारी संघातर्फे रायगड जिल्हा परिषदेवर बुधवारी (दि. 15 ) मोर्चा काढण्यात आला. अंगणवाडी कर्मचार्यांचा मोर्चा अलिबाग मुख्य टपाल कार्यालयाजवळ आला असता पोलिसांनी मोर्चा तो अडविला. मोर्चात सहभागी झालेल्या अंगणवाडी कर्मचार्यांनी विविध घोषणा देऊन परिसर दणाणून सोडला. मोर्चाच्या शिष्टमंडळाने राजिप महिला व बालकल्याण विभागाचे उपमुख्य कार्यकारी अधिकारी नितीन मंडलिक यांना भेटून त्यांचाशी चर्चा केली व आपल्या मागण्यांचे निवेदन सादर केले. अंगणवाडी कर्मचार्यांना कायम शासकीय कर्मचार्यांचा दर्जा द्यावा, अंगणवाडी कर्मचार्यांना मानधन वाढवून मिळावे. अंगणवाडी सेविकांना भविष्य निर्वाह निधी लागू करावा. अंगणवाडी सेविकांना नवीन मोबाईल, योजनेच्या कामांमध्ये सुलभता आणण्यासाठी मातृभाषेत पोषण ट्रकर अॅप व नवीन दरानुसार सिम रिचार्जची आगाऊ रक्कम देण्यात यावी. पूरक पोषण आहाराची रक्कम तिप्पट वाढवावी अशा मागण्या यावेळी करण्यात आल्या आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper