Breaking News

‘अंजुमन-ए-इस्लाम’ नॅशनल अवॉर्डने सन्मानित

पनवेल : रामप्रहर वृत्त

अंजुमन-ए-इस्लाम या प्रख्यात शैक्षणिक व सामाजिक संस्थेचा नुकताच अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटी द्वारे’सर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्ड’ हा वार्षिक राष्ट्रीय पुरस्कार प्रदान करून गौरव करण्यात आला.

गेल्या 147 वर्षातील शैक्षणिक व सामाजिक क्षेत्रातील भरीव योगदान, मुस्लिम अल्पसंख्यांक तसेच समाजातील सीमांत आणि वंचित घटकांमध्ये गुणवत्तापूर्ण शिक्षणाचा प्रसार, स्त्री शिक्षण आणि स्त्री सबलीकरणाचा पुरस्कार आदी संस्थेच्या अविरत  प्रयत्नांच्या सन्मानार्थ अलीगढ मुस्लिम युनिव्हर्सिटीने हा पुरस्कार एका ऑनलाइन सोहळ्यात संस्थेला प्रदान केला.

एक लाख रुपये व सन्मानपत्र असे या पुरस्काराचे स्वरूप असून संस्थेचे विद्यमान अध्यक्ष व प्रसिद्ध वरिष्ठ रेडियोलोजिस्ट डॉ. झहीर काझी यांनी हा सन्मान मेघालय राज्याचे राज्यपाल सत्यपाल मलिक यांच्या हस्ते स्वीकारला.

अंजुमन-ए-इस्लामच्या राज्यभरात 97 शिक्षण संस्था असून दरवर्षी 1लाखाहून अधिक विद्यार्थी इथे शिक्षण घेतात. याशिवाय अनाथ मुलींसाठी अनाथालये, गरजू विद्यार्थ्यांसाठी सहारा स्पॉन्सरशिप  प्रकल्प, वृद्धाश्रम, दवाखाने  इ. संस्था चालविते. कोवीड 19 लॉकडाऊन काळातही संस्थेने गरजू लोकांसाठी अनेक उपक्रम यशस्वीरीत्या राबविले.

अंजुमन-ए-इस्लामचे पनवेल स्थित अब्दुल रज्जाक काळसेकर पॉलिटेक्निक व काळसेकर टेक्निकल कॅम्पसमध्ये पदविका ते पदव्युत्तर तसेच पुढील संशोधनात्मक व्यावसायिक अभ्यासक्रम शिकविले जातात. अब्दुल रज्जाक काळसेकर पॉलिटेक्निक  एआयसीटीईद्वारे क्लीन, ग्रीन, अँड स्मार्ट कॅम्पस पुरस्काराने नावाजलेले एनबीए मानांकन प्राप्त पॉलिटेक्निक असून काळसेकर टेक्निकल कॅम्पस ही नॅक मान्यताप्राप्त आहे.

काळसेकर पॉलिटेक्निकचे प्राचार्य प्रो. रमजान खाटीक आणि काळसेकर टेक्निकल कॅम्पसचे संचालक डॉ.अब्दुल रझाक होनुटगी यांच्या शिस्तबद्ध देखरेखीखाली पनवेल कॅम्पस मध्ये दरवर्षी 5000 हून अधिक विद्यार्थी आपले व्यावसायिक शिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करतात.

अंजुमन-ए-इस्लाम ला या पूर्वीही अनेक राज्य व राष्ट्रीय पुरस्कार मिळाले असून सर सय्यद एक्सैलेन्स नॅशनल अवॉर्ड बद्दल समाजातील सर्व वर्गातून संस्थेचे अध्यक्ष डॉ. झहीर काझी, जनरल सेक्रेटरी जी. ए. आर. शेख, व पदाधिकारी तसेच  मुंबई शिक्षण संस्थांचे एकझ्युकेटीव चेअरमन बुरहान हारिस  आणि सर्व संस्थाचालक मंडळाचे विशेष अभिनंदन होत आहे.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply