मुंबई : प्रतिनिधी
देशाची आर्थिक राजधानी असलेल्या मुंबईत येत्या 27 जानेवारीपासून ’नाइट लाइफ’ सुरू होणार आहे. राज्याचे पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांच्या या संकल्पनेला राज्य मंत्रिमंडळाने बुधवारी (दि. 22) मंजुरी दिली. या निर्णयावर भाजपने टीका केली आहे. ही नाइट लाइफ नाही तर ‘किलिंग लाइफ’ असल्याचे सांगत भाजपचे नेते आशिष शेलार यांनी राज्य सरकारवर हल्लाबोल केला आहे.
या निर्णयानुसार मुंबईतील हॉटेल्स, रेस्टॉरंट व दुकाने 24 तास सुरू राहणार आहेत. त्यास भाजपने विरोध दर्शविला आहे. ही नाइट लाइफ नसून किलिंग लाइफ आहे. मुंबईतील कमला मिल येथे आग लागली होती. त्यामध्ये 14 जणांचा मृत्यू झाला. मुंबईच्या नाइट लाइफला रक्तरंजित इतिहास आहे हे निर्णय घेणार्यांना माहीत नाही का, असा सवाल करीत आशिष शेलार यांनी सरकारच्या नाइट लाइफ निर्णयावर जोरदार टीका केली आहे. याचबरोबर मोठ्या भ्रष्टाचाराची सुरुवात नाइट लाइफच्या माध्यमातून होईल. कमला मिलला आग लागली होती. अतिरिक्त एफएसआय घोटाळा झाला. हा भ्रष्टाचार पाठीशी घालण्यासाठी नाइट लाइफचा निर्णय घेऊन टुरिझमच्या नावाखाली पडदा टाकण्याचे काम सत्ताधारी महापालिका व सरकार करीत आहे, असा घणाघाती आरोप शेलार यांनी केला आहे.नाइट लाइफच्या निर्णयावर मुंबईत विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनीही नाराजी दर्शविली आहे. बलात्कार, दरोडे, खुनासारख्या घटनांनी सामान्य जनतेचे जीवन असुरक्षित असताना नाइट लाइफचा घाट कोणाचा बालहट्ट पुरविण्यासाठी घातला, असा सवालही दरेकर यांनी केला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper