हल्ली आकडे खूप वाढत आहेत… हे वाक्य आताशा ज्याच्या-त्याच्या तोंडी ऐकू येते आणि वास्तव परिस्थिती आहेही तशीच. दैनंदिन नव्या कोरोना रुग्णांच्या संख्येत भारत रोज नवा विक्रम नोंदवतो आहे. यातली अधिक भयावह बाब म्हणजे मोठ्या शहरांकडून आता महामारी छोट्या शहरांमध्ये, गावांमध्ये पसरू लागली आहे. मोठ्या शहरांमध्ये आरोग्यव्यवस्था चांगली असल्यामुळे परिस्थिती काहिशी आटोक्यात तरी आली. म्हणजे भारताने महामारीचे व्यवस्थापन बरे केले म्हणण्याजोगी. पण छोट्या शहरांत, गावांमध्ये आपल्याला तसेच यश मिळेल का?
कोरोनाच्या आजवरच्या एकूण रुग्णसंख्येच्या संदर्भात आपण जगात दुसर्या क्रमांकावर जाऊन पोहचलो, म्हणजे अमेरिकेखालोखाल आपणच हे तर एव्हाना सार्यांनाच ठाऊक झाले आहे. पण रुग्ण बरे होण्याच्या बाबतीतही आपण आघाडीवर आहोत असे सोमवारच्या ताज्या आकडेवारीतून अधोरेखित झाले आहे. भारताचा रिकव्हरी रेट 78 टक्क्यांवर जाऊन पोहचल्याचे केंद्रीय आरोग्य मंत्रालयाने सोमवारी जाहीर केले. सोमवारी नोंदलेल्या आकडेवारीनुसार, मागील 24 तासांत भारतात 92 हजार 71 नवे रुग्ण नोंदले गेले. त्यामुळे आपली कोरोनाची एकूण रुग्णसंख्या 48.46 लाखांवर जाऊन पोहचली. देशात आजवर कोरोनाने 79 हजार 722 जणांचा बळी घेतला असून गेल्या 24 तासांत एक हजार 136 कोरोना-मृत्यूंची नोंद झाली आहे. आपल्या देशात नोंदल्या जाणार्या 92 टक्के कोरोना रुग्णांमध्ये या साथीची सौम्य लक्षणे दिसून येतात, 5.8 टक्के रुग्णांना ऑक्सिजन थेरपीची गरज भासते आणि 1.7 टक्के रुग्णांना अतिदक्षता विभागात ठेवावे लागते. यातली खजील करणारी बाब म्हणजे आजही देशभरात महाराष्ट्रातूनच सर्वाधिक कोरोना रुग्णांची भर पडते आहे. गेल्या 24 तासांत राज्यातून 22 हजार नव्या केसेस नोंदल्या गेल्या आहेत. गेल्या 24 तासांत नोंदल्या गेलेल्या 1,136 मृत्यूंपैकी 36 टक्के (416) मृत्यू हे महाराष्ट्रातील आहेत. आजच्या घडीला देशभरात 37 लाख 80 हजार 107 रुग्ण कोरोनातून बरे झाले आहेत तर नऊ लाख 86 हजार 598 जण हे अॅक्टिव्ह रुग्ण आहेत. बरे झालेले रुग्ण आणि अॅक्टिव्ह रुग्ण यांच्यातील फरक एव्हाना जवळपास 28 लाख एवढा झाला आहे. अर्थात त्याचा अर्थ आजवर आपण कोरोनाचे नियंत्रण बर्यापैकी चांगल्या तर्हेने केले असा होतो आणि याचे श्रेय अर्थातच केंद्र सरकारने योग्य वेळी पुकारलेल्या आणि उत्तमरीतीने अंमलबजावणी केलेल्या लॉकडाऊनला जाते. पण खरी आव्हाने येथून पुढे उद्भवणार आहेत. महानगरांमध्ये कोरोना फैलावत होता तेव्हा त्याला अटकाव करण्यात आपल्याला बर्यापैकी यश आले. परंतु आता तो छोट्या शहरांमध्ये, निमशहरी भागांमध्ये व गावखेड्यांमध्ये पसरू लागला आहे. तिथल्या तुटपुंज्या आरोग्यसुविधांमध्ये आपण त्याला कसे रोखणार आहोत? जागतिक स्तरावर नजर टाकली तर अमेरिकेत दैनंदिन रुग्णसंख्या बरीच खाली आली आहे तर ब्रिटन आणि सिंगापूरमध्ये पुन्हा नव्याने केसेस नोंदल्या जात आहेत. इस्रायलमध्ये सुद्धा केसेस नव्याने वाढू लागल्याने तेथे पुन्हा एकदा कठोर लॉकडाऊन लादण्यात येतो आहे. आपल्याकडच्या मास्क न वापरणार्या वा तो हनुवटीपर्यंत खाली ओढून मिरवणार्या बेजबाबदार लोकांनी या सार्या परिस्थितीची जाणीव ठेवायला हवी आहे. सर्व दक्षतांचे कसोशीने पालन करत राहणे आजही तितकेच आवश्यक आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper