अलिबाग : प्रतिनिधी
रायगड लोकसभा मतदारसंघाच्या निवडणूक निकालाकडे अवघ्या महाराष्ट्राचे लक्ष लागले होते. निवडणूक रिंगणात 16 उमेदवार होते. मात्र शिवसेनेचे अनंत गिते आणि राष्ट्रवादीचे सुनील तटकरे या दोन मातब्बर उमेदवारांमध्ये अटीतटीची लढत झाली आणि सुनील तटकरे यांनी पहिल्यांदा खासदार होण्याचा मान मिळविला.
अलिबागनजिक नेहुली येथील क्रीडा संकुलात गुरूवारी सकाळी 8 वाजल्यापासून मतमोजणीला सुरूवात झाली. मतमोजणीची उत्सूकता सर्वांनाच लागून राहिली होती. त्यामुळे सर्व पक्षीय उमेदवार, कार्यकर्ते आणि सामान्य जनता मोठ्या संख्येने क्रीडा संकुलाच्या बाहेर गर्दी करून होती. एक-एक फेरीचा निकाल जसजसा बाहेर येत होता, तस तसा उत्साह संचारत होता. पहिल्या पाच फेर्यांपर्यंत सुनिल तटकरे आघाडीवर होते. नंतरच्या पाच फेर्यांमध्ये अनंत गीते यांनी आघाडी घेतीली. त्यांनी जवळपास 16व्या फेरीपर्यंत आपली आघाडी कायम ठेवली. त्यामुळे राष्ट्रवादीच्या गोटात शांतता पसरली होती.
या अटीतटीच्या लढतीत कधी सुनील तटकरे तर कधी अनंत गिते आघाडीवर राहत होते. त्यामुळे बाहेर कभी खुशी कभी गम असे वातावरण पहायला मिळत होते. परंतु 19 व्या फेरीला तटकरे यांनी 3 हजारांची आघाडी घेतील ती वाढत गेली. 23 व्या फेरीला निकाल निश्चित झाला. तटकरे विजयी होणार हे लक्षात येताच अनंत गीते यांनी तटकरे यांचे अभिनंदन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper