पनवेल : प्रतिनिधी : नवीन पनवेलमधील शिवसेना महिला आघाडी यांनी नवीन पनवेल सेक्टर 5 ए मधील पुलाच्याखाली आणि रेल्वेरुळाच्या जवळील पादचारी रस्त्यावर अनधिकृत भाजीवाले, हातगाडीवाले असे जवळपास 15-20 वेगवेगळे व्यावसायिक तेथे व्यवसाय करीत असल्याने नागरिकांना चालण्यास त्रास होत असतो, ह्यासंबंधीत कारवाई व्हावी ह्यासाठी पनवेल महानगरपालिका आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे निवेदनाद्वारे मागणी करण्यात आली.
यावेळी नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू, ग्राहक कक्षाचे महानगरप्रमुख किरण तावदरे, ग्राहक कक्षाचे उपमहानगर प्रमुख अंकुर पाटील, नविन पनवेल उपशहर संघटक मंदाताई जंगले, विभाग संघटक वैशाली थळी, उपविभाग संघटक शारदा सुरवसे आदी उपस्थित होते. यावेळी त्यांनी नवीन पनवेल सेक्टर 5 परिसरात गेल्या काही दिवसांपासून होत असलेल्या वाढत्या अतिक्रमणाची माहिती आयुक्त गणेश देशमुख यांना दिली. यामुळे शालेय विद्यार्थ्यांसह पादचार्यांना येथून ये-जा करणे त्रासाचे बनत आहे. तसेच त्यामुळे अनेक वेळा
भांडणेसुद्धा होत असतात. तरी या गोष्टीकडे गांभीर्याने लक्ष घालून तेथील अतिक्रमण हटवावे, अशी मागणी नवीन पनवेल महिला आघाडी संघटक अपूर्वा प्रभू यांनी आयुक्त गणेश देशमुख यांच्याकडे केली. या मागणीची दखल घेत तातडीने त्या ठिकाणी कारवाई करण्याचे आश्वासन आयुक्त देशमुख यांनी दिले आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper