भविष्यातील या धोक्याचा वेध घेणे, वर्तमानातून धडा घेणे आणि शहरांचे व तेथे राहणार्या लोकसंख्येचे सुयोग्य नियोजन करणे, निसर्गावर कुरघोडी करण्याचा प्रयत्न न करणे, जेथे नैसर्गिक प्रवाह आहेत तेथे विनाकारण ढवळाढवळ करणे कटाक्षाने टाळणे, अशा काही मोजक्याच बाबी सध्या तरी प्रशासनाच्या आणि सगळ्यांच्याच हातात आहेत. त्या जरी पाळल्या तरी बरेच सुसह्य होईल, अन्यथा हवा हवासा वाटणारा पाऊस कायमच संकटांची मालिका घेऊन येणार्या एखाद्या यमदूतासारखाच भासत राहील.
राज्यात पावसाने थैमान घातले आहे. विदर्भ आणि मराठवाड्याचा भाग वगळता मुंबई, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना त्याचा जोरदार तडाखा बसला आहे. त्यानंतर नाशिक आणि पुण्याकडेही पावसाची वक्रदृष्टी पडल्याचे गेल्या आठवड्यात पाहायला मिळाले. या दोन जिल्ह्यांच्या शहरी भागांत विशेष आपत्कालीन स्थिती नव्हती, मात्र धरणक्षेत्रात झालेल्या कोसळधारेने शहरी भागांतही दैना उडाली. धरणांची कमाल मर्यादा ओलांडल्यामुळे पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग करावा लागला. पावसाची लहर आणि निसर्गाचा कहर वगैरे भाकड गोष्टी सांगाव्यात असाही आताचा काळ नाही. जे काही होत आहे, ते निसर्गाचे चक्र बिघडल्यामुळे. अतिहाव चांगली नाही, असे म्हणतात, मात्र मानव हा एकमेव प्राणी असा आहे, त्याची हाव कधीच संपत नाही. त्यामुळे अति झाले आहे का, आणि आता थांबायला हवे का, अशा कोणत्याच गोष्टीचा तो विचार करीत नाही. निसर्गात मानवाचा हस्तक्षेप वाढला तेव्हापासून संकटे येण्यास सुरुवात झाली आहे. ग्लोबल वॉर्मिंग अर्थात जागतिक तापमान वाढ हे त्यापैकीच एक असलेले महासंकट. ते आले आहे आणि लवकर जाण्याची सुतराम शक्यता नाही. ते उपद्रव करणार आहे. तो रोखता येण्याची वेळ केव्हाच निघून गेली आहे. त्याचा उपद्रव कमी होईल यासाठी सामूहिक प्रयत्न करणे एवढेच आज हातात आहे. स्टीफन हॉकिंग यांच्यासारख्या द्रष्ट्या शास्त्रज्ञानेही धोक्याचा इशारा दिला होता. येत्या 100 वर्षांत पृथ्वी ही राहण्यायोग्य राहिलेली नसेल. आपल्याला नव्या ठिकाणाचा शोध घ्यावा लागेल, अशा आशयाची भीती त्यांनी साधार व्यक्त केली होती. आज त्याच दिशेने वाटचाल सुरू आहे, असे दिसून येत आहे. बरेच जिल्हे असे आहेत की जेथे गेल्या दशकभरात पाऊसच झालेला नाही, तर बर्याच जिल्ह्यांत पाऊस थांबायचे नाव घेत नाही. जेथे पावसाच्या कालखंडात पाऊस पडत नाही, तेथे अवकाळी पाऊस मात्र तुफान बरसतो. विदर्भ आणि मराठवाड्याने हे गेल्या दोन-पाच वर्षांत सातत्याने अनुभवले आहे. चार महिने एका ठरावीक पॅटर्नने पाऊस पडतोय असेही होत नाही. तीन महिने गायब आणि आठवडाभरात आभाळ फाटल्यासारखा कोसळणे आणि त्यातही कोणती लय नसणे, हे सगळे बिघडलेल्या चक्राचेच फलित आहे. पाण्याचा निचराच होऊ शकत नाही. मुंबईत 2005मध्ये झालेल्या ढगफुटीचे उदाहरण आजही दिले जाते, मात्र ज्या प्रकारे त्या शहरात किंवा अन्य शहरांतही काँक्रिटचे जंगल उभे राहिले आहे आणि लोकसंख्येचा स्फोट होत आहे, तो पाहता आगामी काळात दिवसाला 50 मिमी पाऊस पडला तरी शहरांमध्ये घुसलेले पाणी बाहेर पडणे अवघड होऊन जाईल, अशी भीती तज्ज्ञांकडून व्यक्त होत आहे. त्यामुळे सार्यांनीच याचा गांभीर्याने विचार करायला हवा, एवढे मात्र निश्चित.
RamPrahar – The Panvel Daily Paper