Breaking News

अमानुष 50 वर्ष

दिल ऐसा किसीने मेरा तोडा….

प्रेमभंग झालेला नायक कमालीचा व्यथित झाल्याने एकच प्याला हाती करतो, आपले सगळेच दु:ख त्या दारूच्या ग्लासात ओततो. आपण निर्दोष आहोत, आपलं तिच्यावरचं प्रेम अतूट आहे, खरं आहे, तिने आपल्याला समजून घ्यावे अशी तो मनोमन विनवणी करतो. दारुच्या व्यसनापायी तो देवदास बनतो…. कृष्ण धवल अर्थात ब्लॅक अँड व्हाईट चित्रपटापासून रंगीत चित्रपटापर्यंत अनेकदा तरी असा प्रेमभंग झालेला नायक रुपेरी पडद्यावर आला, एकादा प्रेमभंग झालेला नायक योगायोगाने चक्क कोठीवरही पोहचला. त्याच्या या दु:खाने चित्रपटगृहाच्या अंधारातील प्रेक्षक गलबलला. त्याच्यावर अशी दुर्दैवी वेळ यायला नको होती असे त्यांना वाटले आणि असे प्रेमात अपयशी ठरलेल्या नायकांचे अनेक चित्रपट लोकप्रिय ठरले.. दिलीपकुमार तर त्यातून ट्रॅजेडी किंग म्हणून नावाजला. एक सुपरहिट फॉर्मुला बरेच काही घडवतो. अमानुषदेखील सुपरहिट शक्ती सामंता निर्मित व दिग्दर्शित अमानुष एकाच वेळेस बंगाली व हिंदी भाषेत निर्माण झाला. बंगाली भाषेतील अमानुष 1974 च्या दुर्गा पुजेच्या वेळेस पूर्व बंगालमध्ये प्रदर्शित झाला आणि रसिक प्रेक्षकांनी बघता बघता तो लोकप्रिय झाला. कोलकत्ता शहरातील चित्रपटगृहात त्याने तब्बल 96 आठवडे मुक्काम केला. चित्रपटगृहाशी असलेला शक्ती फिल्म्सचा करार संपुष्टात आल्याने तो चित्रपटगृहातून उतरवण्यात आला. अन्यथा शतक निश्चित होते.
बंगाली अमानुष हाऊसफुल्ल गर्दीत सुरू असतानाच हिंदीतील अमानुष 21 मार्च 1975 रोजी मुंबईत प्रदर्शित झाला. मुंबईत मेन थिएटर मिनर्व्हा मॅटीनी शो आणि लिबर्टी (दिवसा तीन खेळ) व इतरत्र प्रदर्शित झाला. (त्याला पन्नास वर्ष पूर्ण झालीदेखिल यानिमित्त हा फोकस). हिंदीतदेखिल अमानुष लोकप्रिय ठरला.
उत्तमकुमार हा बंगाली चित्रपटातील दिलीपकुमार म्हणून ओळखला जाई. अष्टपैलू लोकप्रिय अभिनेता. साठच्या दशकात त्याने हिंदीत टाकलेले पाऊल अपयशी ठरले. आता दिग्दर्शक शक्ती सामंता यांनी त्याला हिंदीत पुन्हा संधी दिली. त्या संधीचा त्याने योग्य वापर केला. एक तर त्याचीच गरज असते आणि दुसरे म्हणजे तशी दमदार व्यक्तिरेखाही मिळावी लागते.
शक्ती सामंता व शर्मिला टागोर ही दिग्दर्शक व कलाकार अशी जमलेली जोडी. दोघेही मुळचे बंगालचे. शक्तीदा यांनीच कश्मीर की कली तून शर्मिला टागोरला हिंदी चित्रपटाच्या रुपेरी पडद्यावर आणले. त्याच शक्ती सामंता यांनी न इव्हिनिंग इन पॅरीस मध्ये याच शर्मिला टागोरला पॅरीसच्या उत्फूर्त अशा समुद्रात बेदींग सूटात दाखवले (एका प्रख्यात इंग्लिश मासिकाच्या मुखपृष्ठावर शर्मिला टागोरचे असे रुपडे प्रसिद्ध होताच जणू सांस्कृतिक धक्काच बसला. आजच्या ग्लोबल युगातील डिजिटल पिढीसमोर असं म्हणजे किरकोळ गोष्ट.) टीकाटिप्पणीच्या उलटसुलट वादळातून बाहेर पडण्याचा मार्ग असतो तो रुपेरी पडद्यावरील परफॉर्मन्स. शर्मिला टागोरने ते साध्य केले त्यात एक चित्रपट होता, शक्ती सामंता दिग्दर्शित आराधना (1969), मग अमर प्रेम (1972). या जोडीचे चरित्रहीन, आनंद आश्रम इत्यादी चित्रपटही आले. अमानुष हा चित्रपट शक्तीपदा राजगुरु यांच्या नया बसन या साहित्यवार आधारित (पूर्वी मराठी व बंगालीत मोठ्याच प्रमाणावर साहित्यवार आधारित चित्रपट निर्माण होत. त्यावरूनचे पटकथा लेखन जास्त महत्वाची गोष्ट. शब्द माध्यमातून दृश्य माध्यमात जाणे.) संवादलेखन प्रभात रॉय यांचे. छायाचित्रण आलोक दासगुप्ता यांचे.
बंगालमधील समुद्र किनार्‍यावरील एका छोट्याश्या हिरव्यागार गावात घडणारी ही गोष्ट. मधुसूदन अर्थात मधुरॉय चौधरी (उत्तमकुमार) व लेखा (शर्मिला टागोर) यांच्या प्रेमसंबंधात एक विचित्र विघ्न येते. मधु रॉयने दारुच्या नशेत आपल्याशी केलेल्या बळजबरीतून आपण गर्भवती राहिल्याचा आरोप गावातीलच एक युवती मातों उर्फ धन्नो (प्रेमा नारायण) करते आणि मधु व लेखा यांच्या प्रेमसंबंधात मोठेच विघ्न येते. सगळीच घडी विस्कटून जाते. मधु पूर्णपणे दारुच्या आहारी जातो तर लेखा प्रचंड हवालदिल होते. धन्नो गावातून गायब झालेली असते. चित्रपट क्लायमॅक्सकडे जाताना सगळेच गैरसमज दूर होतात. सत्य काय ते समोर येते. चित्रपटात डॉक्टर, पोलीस इन्स्पेक्टर अशा अनेक लहान मोठ्या व्यक्तीरेखा आहेत. अनिल चटर्जी, उत्पल दत्त, मनमोहन, असित सेन, माणिक दत्त, मदन घोष, सुबर्तो महापात्रा, अमोल सेन, प्रभात रॉय इत्यादींच्या भूमिका. गावाचा परिसर, होडीतून प्रवास, संथ जीवनशैली हे सगळेच कथेला पूरक आणि चित्रपटाला वेगळ्याच वातावरणात नेणारे. उत्तमकुमारभोवती सगळा चित्रपट आहे आणि तसे भान ठेवत त्याने आपले काम केलेय. विशेषत: प्रेमभंग झाल्यानंतरची उदासीनता त्याने उत्तम साकारलीय. तोच या चित्रपटाचा गाभा आहे. इंदिवर यांच्या गीतांना श्यामल मित्रा यांचे संगीत ही या चित्रपटाची मोठीच जमेची बाजू. पटकथेनुसार ती आहेत. त्यामुळे चित्रपटातील आपली उत्सुकता कायम राहते. तेरे गालो को चुमू (पार्श्वगायक किशोरकुमार व आशा भोसले), दिल ऐसा किसीने मेरा तोडा (किशोरकुमार), गम की दवा तो प्यार है (आशा भोसले), ना पुछे कोई हमें (किशोरकुमार), कल के अपने ना जाने (आशा भोसले) ही गाणी लोकप्रिय ठरली.
एका भाषेतील सुपरहिट चित्रपटाची अन्य भाषेत रिमेक तर होणारच. यशाला फॉलो करणे ही तर चित्रपटसृष्टीची परंपरा. अमानुषची तेलगू, तमिळ, मल्याळम या तीनही भाषेत रिमेक झाली. प्रेमभंगापायी दारुच्या ग्लासात स्वतःला झोकून देणारा नायक हे कथासूत्र त्या काळात रसिकांनी पाहताना नायकाला सहानुभूती दाखवली. आज तशी व तेवढीच सहानुभूती मिळेल का हा बदलत्या सामाजिक सांस्कृतिक स्थितीनुसार प्रश्नच तर आहे.
उत्तमकुमार हिंदीत फारसा रुळलाच नाही. बहुतेक बंगाली चित्रपटसृष्टीतील वातावरण, कामाची पद्धत, मिळालेल्या भूमिका, तिकडच्या चित्रपटसृष्टीतील स्थान या गोष्टींच्या तुलनेत हिंदीत त्याला परकेपण वाटले असेल. एका ठिकाणचे रुजणे दुसरीकडे रुजेलच असे नाही. 1967 साली अग्रदूत दिग्दर्शित छोटी सी मुलाकात या चित्रपटात वैजयंतीमालाचा नायक म्हणून त्याने हिंदी चित्रपटसृष्टीत पाऊल टाकले, त्यात यश न आल्याने बंगालीवरच त्याने आपला फोकस कायम ठेवला.
काही वर्षांनी शक्ती सामंता यांनी अमानुष साठी तोच योग्य असे मानवत त्याचे हिंदीत पुनरागमन केले. अर्थात, हा चित्रपट एकाच वेळेस बंगाली व हिंदीत निर्माण झाल्याचेही उत्तमकुमारच्या पथ्यावर पडले. आणि पिक्चर सुपर हिट म्हटल्यावर हिंदीत आणखीन ऑफर येणारच. त्यात शक्ती सामंता दिग्दर्शित आनंद आश्रम, गुलजार दिग्दर्शित किताब, ए. भीमसेन दिग्दर्शित दूरिया असे काही स्वच्छ मनोरंजक चित्रपट मिळाले. तर मनमोहन देसाई दिग्दर्शित देशद्रोही मध्ये अमिताभ बच्चनसोबत संधी तर मिळाली पण चित्रपट निर्मितीवस्थेत असा व इतका काही रखडला की या दोघांना एकाच चित्रपटात पाहण्याची उत्सुकताच संपली. उत्तमकुमारने आणखीन काही हिंदी चित्रपटातून काम केल्यावर बंली चित्रपट हीच आपली कर्मभूमी ठरवली आणि तेथे अधिकाधिक प्रमाणात तो यशस्वी ठरला. ….पन्नास वर्षांनंतर अमानुष त्यातील गाण्यांनी आजही आपल्या समोरच आहे. चित्रपटातील गाण्यांची जागा पटकथेनुसार असेल आणि ती गाणी श्रवणीय असतील तर तो चित्रपट कधीच पडद्याआड जात नाही, हेदेखील यशच. अशी गाणी अलिकडच्या चित्रपटातून फारशी पाह्यला/ ऐकायला मिळतात का हो? दर्जेदार गीत संगीताने चित्रपटाचे आयुष्य वाढते. हे कान देऊन ऐका.

दिलीप ठाकूर – चित्रपट समीक्षक

Check Also

सीकेटी कॉलेजमध्ये आंतर-महाविद्यालयीन बॉक्सिंग स्पर्धा

माजी सभागृह नेते परेश ठाकूर यांच्या हस्ते उद्घाटन; 422 स्पर्धकांचा सहभाग पनवेल : रामप्रहर वृत्तजनार्दन …

Leave a Reply