Breaking News

‘अमृत आहार’ची बिले थकली

पोषण आहार बंद; कुपोषण वाढण्याची भीती

कर्जत ः बातमीदार – कर्जत तालुक्यातील आदिवासी भागातील अंगणवाडी केंद्रातील बालके तसेच त्या हद्दीमधील गरोदर महिला आणि स्तनदा मातांना अतिरिक्त पोषण आहार शासनाकडून विशेष बाब म्हणून अमृत आहार योजनेतून दिला जातो. त्या पोषण आहाराची मागील बिले थकली असून मागील दोन महिन्यांपासून पोषण आहार देणेदेखील बंद करण्यात आला आहे. दरम्यान, शासन देत आहे, पण खालील यंत्रणा योजनेच्या नियमाप्रमाणे राबविली जात नाही. त्यामुळे अशी स्थिती निर्माण झाली असून अंगणवाडीमधील बालकांना अतिरिक्त पोषण आहाराला मुकावे लागत आहे, अशी खंत दिशा केंद्र या सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते अशोक जंगले यांनी व्यक्त केली आहे.

कर्जत तालुका आदिवासीबहुल तालुका असून तालुक्यातील आदिवासी भागातील अंगणवाडीमध्ये येणारी बालके आणि त्या अंगणवाडी हद्दीमधील गरोदर महिला तसेच स्तनदा मातांना शासन खास बाब म्हणून अतिरिक्त आहार देण्यात येतो. डॉ. अब्दुल कलाम अमृत पोषण आहार योजनेच्या माध्यमातून पोषण आहार दिला जातो. गेली काही वर्षे या योजनेतून आहार दिला जातो, पण त्याचवेळी या योजनेवर नियंत्रण न राहिल्याने आदिवासी भागातील 89 अंगणवाड्यांमधील या योजनेचा पोषण आहार दोन महिन्यांपासून बंद होता. योजना चालविण्यासाठी येणारा खर्च कोणी द्यायचा, असा प्रश्न त्यावेळी समोर आल्याने अमृत आहार योजनेची बिले तब्बल दोन महिने थकल्याने योजनाच बंद होती. त्याचा परिणाम स्तनदा मातांपेक्षा गरोदर महिलांवर जास्त होताना दिसत आहे. कारण गरोदर महिलेच्या पोटात वाढणार्‍या बाळाला दिला जाणारा अतिरिक्त पोषण आहार अमृत आहार योजनेतून दिला जाणार होता. तो बंद झाल्याने त्या महिलेच्या उदरातील बाळाची नीट वाढ होण्यात अडचणी आल्या आहेत. त्याच वेळी कुपोषणाच्या उंबरठ्यावर असलेल्या बालकांनादेखील पोषण आहार मिळाला नसल्याने कुपोषण वाढल्याचे दिसून येते.

कर्जतमध्ये सहा प्राथमिक आरोग्य केंद्र असून त्या आरोग्य केंद्रांपैकी खंडास, कळंब, आंबिवली या तीन ठिकाणी असलेल्या प्राथमिक आरोग्य केंद्रांत सर्वाधिक आदिवासीबहुल भाग आहे. हे सर्व लक्षात घेऊन शासनाने अमृत आहार योजना सुरू केली आहे, पण त्या योजनेची बिले तालुका स्तरावर आणि जिल्हा स्तरावरदेखील थकली आहेत. ही शासनाची योजना असून या डॉ. अब्दुल कलाम अमृत आहार योजनेसाठी अतिरिक्त आहार आदिवासी उपयोजनांच्या निधीमधून दिला जात आहे. त्यामुळे तालुका यंत्रणेने आपल्या भागातील पोषण आहाराची बिले जिल्हा परिषदेकडे पाठविली आहेत. ती बिले या योजनेवर खर्च केलेल्या आदिवासी विकास विभागाच्या पेण येथील प्रकल्प कार्यालयाकडे सादर केली पाहिजेत आणि तेथून बिले राज्य शासनाकडे वर्ग केली पाहिजेत, परंतु कर्जत येथील एकात्मिक बालविकास विभागाच्या प्रकल्पाकडून ती बिले परस्पर रायगड जिल्हा परिषदेकडे दिल्याने अडचणी निर्माण झाल्या आहेत. परिणामी बिले थकली असून बिले मिळत नसल्याने अंगणवाडीतून अतिरिक्त पोषण आहार मिळणे बंद झाले आहे. 

आमच्या संस्थेला शासनाने समन्वयक म्हणून नेमले आहे. त्यामुळे आमचे कार्यकर्ते सतत पाठपुरावा करतात, मात्र बिले मिळाली नसल्याने अंगणवाडीमधून पोषण आहार देणे बंद झाले आहे. ही बाब समजताच आम्ही माहिती घेतली असता त्यातील गोम आमच्या लक्षात आली. त्यामुळे बंद पडलेला अतिरिक्त पोषण आहार लवकरच सुरू करून कुपोषण रोखण्याकडे आमचे लक्ष आहे.

-अशोक जंगले, कार्यकर्ता, दिशा केंद्र आणि अमृत आहार योजना जिल्हा समन्वयक

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply