Breaking News

अर्धवट पुलाच्या बांधकामाचा फटका

कच्चा रस्ता वाहून गेल्याने 10 किलोमीटरचा वळसा

पनवेल : बातमीदार – केवाळे येथील पुलाचे काम अपूर्ण असल्याने काही नागरिकांना जवळपास 10 किलोमीटरचा वळसा घेऊन प्रवास करावा लागत आहे, तर काही वाहने याच धोकादायक पुलावरून ये-जा करत आहेत. सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष व ठेकेदाराच्या आळशीपणामुळे नागरिकांना मनस्ताप सहन करावा लागत आहे. ठेकेदाराने बनवलेला कच्चा रस्ता पाण्यात वाहून गेला आहे.

शांतिवन-भानघर रस्तामार्गे वाहने जाऊ लागल्याने या ठिकाणी वाहतूक कोंडी होऊ लागली आहे. हा रस्ता एकेरी असल्याने एकाच वेळेस वाहने आल्याने वाहतुकीला अडथळे निर्माण होऊ लागले आहेत, तर दुसरीकडे आणखी एक महाळुंगी येथील पुलाचे काम अर्धवट स्थितीत आहे. महाळुंगीमार्गे नेरे, मोरबे परिसरातील नागरिक मोठ्या प्रमाणात तळोजा एमआयडीसीमध्ये नोकरीसाठी जातात, मात्र हा पूलदेखील अर्धवट असल्याने व नदीमध्ये मोठ्या प्रमाणावर पाणी जात असल्याने त्यांना पनवेल मार्गे तळोजा गाठावे लागत आहे. 28 जून रोजी काहींनी चालत या पाण्यातून रस्ता काढत आपले घर गाठले. सुरक्षेसाठी या केवाळे व महाळुंगी पुलावर ठेकेदाराने कोणतीही काळजी घेतलेली दिसून येत नाही. नदीच्या खालून जाण्यासाठी बांधलेला कच्चा रस्ता वाहून गेल्याने नागरिकांच्या अडचणीत वाढ झालेली आहे.

बस सेवा बंद

केवाळे रस्ता बंद झाल्यामुळे येथून मोरबेकडे जाणारी बस सेवा बंद करण्यात आलेली आहे. मोरबे येथे सकाळी व संध्याकाळी आशा दोन वेळा बस सोडण्यात येत होती. त्यामुळे या बसमध्ये आदिवासी बांधवांची संख्या मोठी होती. बस बंद केल्यामुळे प्रवाशांना मिळेल ते वाहन पकडून घर गाठावे लागत आहे.

ठेकेदारावर कारवाई करण्याची मागणी

गेल्या तीन महिन्यांपासून केवाळे येथील पुलाचे काम सुरू आहे, मात्र ते पूर्ण करण्यात आलेले नाही. अतिशय संथ गतीने काम सुरू असल्याने पुलाचे काम पूर्ण झालेले दिसून येत नाही त्यामुळे त्याचा मनस्ताप नागरिकांना व वाहनचालकांना सहन करावा लागत आहे. अर्धवट पुलाचे काम करणार्‍या ठेकेदारावर दंडात्मक कारवाई करून त्याला काळ्या यादीत टाकण्याची मागणी प्रवासी करू लागले आहेत.

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply