रोहे ः प्रतिनिधी
कोरोनाच्या पार्श्वभूमीवर जारी केलेल्या लॉकडाऊन काळात रोहा पोलीस ठाण्याच्या हद्दीत रोहा पोलीस व वाहतूक पोलिसांच्या माध्यमातून दुचाकी व चारचाकी वाहनांवर कारवाई करीत 1503 केसेस दाखल करण्यात आल्या आहेत. या केसेसमधून 4,29,200 रुपये तडजोड शुल्क वसूल करण्यात आले आहे.
देशभरात व राज्यात कोरोनाचा फैलाव रोखण्यासाठी लॉकडाऊन जारी करण्यात आले आहे. या काळात अत्यावश्यक सेवा वगळता अन्य गाड्या रस्त्यावर उतरविण्यास बंदी घालण्यात आली आहे. तरीही रोहा शहरात अनेक दुचाकी व चारचाकी वाहने रस्त्यावर उतरल्यामुळे रोहा वाहतूक पोलिसांनी धडक कारवाई केली. 27 मार्च ते 5 मेदरम्यान 1503 केसेस दाखल करण्यात आल्या असून त्या माध्यमातून 4,29,200 रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.रोहा पोलीस निरीक्षक नामदेव बंडगर, जिल्हा वाहतूक शाखा पोलीस निरीक्षक रवींद्र शिंदे, सहाय्यक पोलीस निरीक्षक सुभाष जाधव, उपनिरीक्षक शेगडे, अडगळे यांच्या मार्गदर्शनाखाली रोहा पोलीस ठाण्याच्या सहकार्याने वाहतूक पोलीस हणमंत धायगुडे, जनार्दन चेरकर, मपोना. प्रशिला चव्हाण, पो. कॉ. शिर्के यांनी रोहा शहरात लॉकडाऊन काळात भर उन्हात राम मारुती चौक, दमखाडी नाका, रोहा अष्टमी पूल येथे वेळोवेळी नाकाबंदी करून अवैध वाहनांवर कारवाई केली. परवाना नसणे, गाडीची कागदपत्रे व लॉकडाऊन काळात फिरणे अशा अनेक कारणांवरून वाहनचालकांवर कारवाई करण्यात आली.
RamPrahar – The Panvel Daily Paper