माथेरान : वार्ताहर
नॅशनल इंड्युरन्स चॅम्पियनशीपच्या माध्यमातून नुकताच लोणावळा येथे आयोजित करण्यात आलेल्या अश्वशर्यतीत माथेरानमधील घोड्यांनी अव्वलस्थान प्राप्त केले.
दरवर्षी लोणावळा येथे अश्वशर्यत आयोजित करण्यात येते. देशभरातील नामवंत घोडे यामध्ये सहभागी होत असतात. यंदा प्रथमच माथेरानमधील व्यावसायिक घोडे या स्पर्धेत सहभागी झाले होते. नैसर्गिक वातावरणात स्वच्छ व शुद्ध हवेत हे घोडे सदृढ असल्याने बहुतांश घोड्यांनी या राष्ट्रीय स्पर्धेत अग्रक्रम प्राप्त केला.
स्पर्धा जंगलातून, खडतर रस्त्यावर, तसेच चढ-उतारावर झाली. यात 20, 40 आणि 60 किलोमीटरपर्यंतच्या शर्यती झाल्या. एकूण 50 घोड्यांमध्ये माथेरानच्या सात ते आठ घोड्यांना यश संपादन करण्यात काहीही अवघड वाटले नाही. अगदी सहजपणे बहुतांश घोड्यांना यश मिळाले. त्यांच्या घोडेस्वारी करणार्या जॉकी आणि मालकांना मान्यवरांच्या हस्ते प्रशस्तीपत्र देण्यात आले.
या वेळी माथेरान नगर परिषदचे गटनेते तथा बांधकाम सभापती प्रसाद सावंत, नगरसेवक नरेश काळे, शकील पटेल, माजी नगरसेवक कुलदीप जाधव, माथेरान युथ सोशल क्लबचे अध्यक्ष प्रशाम दिवाडकर, ज्येष्ठ सामाजिक कार्यकर्ते लक्ष्मण कदम आदींसह पशुतज्ज्ञ, वैद्यकीय अधिकारी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper