भारतातील सर्वांत मोठी म्हणजे 15 लाख कोटी रुपये इतके विक्रमी भांडवल असलेल्या रिलायन्स इंडस्ट्रीजचा इतिहास रोचक आहे. रिलायन्स कंपनीच्या सुरुवातीच्या वर्षात झालेली उभारणी ही अशी होती…
आज आशियातील सर्वांत श्रीमंत व्यक्ती कोण हे सर्वांनाच माहीत असेल. आज आपण त्यांच्या कंपन्यांबद्दल जाणून घेण्यापूर्वी या त्यांच्या वारसाबाबत काही रोचक बाबी जाणून घेतल्याशिवाय पुढे जाण्यात अर्थ नाही. ज्या लोकांनी 2007मध्ये आलेला ‘गुरू’ हा चित्रपट पाहिला असेल त्यांना धीरूभाई उर्फ धीरजलाल हिराचंद अंबानी यांचा इतिहास समजलाच असेल. धीरूभाई हे काठियावाड गुजराती असून बनिया समाजाचे असल्याने त्यांच्या रक्तातच व्यवसाय होता. सुरुवातीस त्यांनी येमेन म्हणजे आखाती देशात जाऊन अनेक नोकर्या केल्या व त्यांना हळूहळू तिथला व्यवसाय कळू लागला. नंतर ते स्वतःचा व्यवसाय करण्यासाठी भारतात परतले.
1957मध्ये येमेनमधून भारतात परतल्यावर त्यांनी पॉलिस्टर यार्न आयात करणे आणि येमेनला मसाले निर्यात करणे हा व्यवसाय मस्जिद बंदर येथील केवळ 350 चौ. फूट ऑफिसमधून सुरू केला. कंपनीचे नाव होते रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशन. त्यांच्या व्यावसायिकतेवर त्या काळचा एक किस्सा सांगितला जातो. तो म्हणजे दुबईतल्या एका अरबाने गुलाबाचे रोपटे लावण्यासाठी धीरूभाईंकडे भारतातील माती मागितली होती आणि त्यांनीदेखील ती त्या अरबास विकत दिली होती. धंदा ऐसा होता हैं!
पुढे 1965मध्ये धीरूभाईंच्या जोखीम घेण्याच्या सवयीमुळे त्यांची त्यांच्या भावाबरोबरील भागीदारी संपुष्टात आली. नंतर रिलायन्स कमर्शिअल कॉर्पोरेशनचे नाव रिलायन्स इंडस्ट्रीज झाले. 1977 साली ही कंपनी शेअर बाजारात नोंदणीकृत झाली आणि येथूनच खर्या अर्थाने धीरुभाईंचे नाव चर्चेत राहू लागले. करोनाच्या संकटात मार्चमध्ये दीड-दोन तास शेअर मार्केट बंद राहिल्यावर (सर्किट) अनेकांची धाबी दणाणली होती, परंतु मार्च 1988मध्ये एकट्या धीरूभाईंमुळे अख्खे शेअर मार्केट तब्बल तीन दिवस बंद राहिले होते. रिलान्यस इंडस्ट्रीजने आपले राईट इश्यू जारी केले आणि आपल्या कंपनीचा भाव पडू द्यायचा नाही अशी अफवा बाजारात पसरली. लागलीच कोलकात्यामधील काही ब्रोकर्सनी मिळून धीरूभाईंना कॉर्नर करण्यासाठी रिलायन्सच्या शेअर्सची तुफान विक्री करावयास सुरुवात केली. तेव्हा आपल्याकडे शेअर्स नसतील तरी तोंडी शेअर्सची खरेदी-विक्री होत असे व दर शुक्रवारी शेअर्सची देवघेव म्हणजेच विकलेले शेअर्स खरेदीदारांना देणे आणि नफा-नुकसान स्वीकारून व्यवहारपूर्ती करणे. त्यामुळे वरच्या भावात मोठ्या प्रमाणात विक्री करून भाव पाडून शुक्रवारपर्यंत कमी किमतीत ते शेअर्स खरेदी करायचे व बक्कळ नफा कमवायचा असा काहीसा या कोलकात्याच्या ब्रोकर्सचा प्लॅन होता. याची कुणकुण धीरूभाईंना लागली आणि ज्यांना रिलायन्स मित्र म्हटले गेले अशा ब्रोकर्समार्फत धीरूभाईंनी शेअर्स खरेदी करावयास सुरुवात केली. (कायद्याने कंपनी स्वतः आपलेच शेअर्स खुल्या बाजारातून थेट खरेदी करू शकत नाही.) एकूण सुमारे 11 लाख शेअर्सची विक्री केली गेली होती आणि त्यापैकी बहुसंख्य शेअर्सची खरेदी रिलायन्स मित्र कंपन्यांकडून केली गेली होती. अर्थातच धीरूभाईंच्या सांगण्यावरून. 131 रु. असलेला भाव पुढच्या सौदेपूर्तीच्या दिवशी 152 झाला होता. कोलकात्याच्या ब्रोकर्सकडे शेअर्स नव्हते आणि रिलायन्स मित्र शेअर्सची डिलिव्हरी मागत होते. यावर तोडगा काढण्यासाठी (मुदतवाढ) शेअर बाजार तीन सत्रे बंद ठेवण्यात आला होता. आता विक्री करणार्यांना एकच पर्याय होता चढ्या भावाने शेअर्स खरेदी करणे आणि खरेदीदारांना (मित्र) देणे. ही बाब समोर आल्यावर रिलायन्सच्या शेअरचा भाव 182 रुपयांवर पोहचला होता. असे समजले जाते की नंतर धीरूभाईंनीच या ब्रोकर्सना वरच्या भावात शेअर्स पुरविले आणि भरपूर नफा कमावला.
तेव्हापासून धीरूभाईंचा एक दबदबा राहू लागला आणि या गोष्टीमुळे सामान्य गुंतवणूकदारांच्या मनात त्यांच्याबद्दल एक विश्वास व आदर निर्माण झाला की रिलायन्सच्या शेअरचा भाव कितीही ताकदवान व्यक्ती वरती-खाली करू शकत नाही. यामुळे पुढील काही वर्षांत लाखो गुंतवणूकदार जोडले गेले. अशी होती एका बिझनेसमॅनची शेअर बाजारावरील पकड. 80च्या दशकातील पाताळगंगा पॉलिस्टर यार्न प्रोजेक्ट केवळ 18 महिन्यांमध्ये उभारून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिलेला होता. त्यानंतर 1991-92मध्ये कंपनीचा हजिरा येथील पेट्रोकेमिकल प्लँट सुरू झाला. 1993मध्ये रिलायन्सने जगभरातील शेअर बाजारांमधून आपल्या रिलायन्स पेट्रोलियमद्वारे ग्लोबल डिपॉझिटरी इश्यूच्या माध्यमातून पैसे उभारले.
* 1996 साली ही भारतातील पहिली खासगी कंपनी होती, ज्यांना एसपी या पत मूल्यांकन करणार्या आंतरराष्ट्रीय कंपनीने मूल्यांकीत केले होते.
* 1995-96 साली रिलायन्सने टेलिकॉम क्षेत्रात प्रवेश करून खळबळ माजवली.
* 2000नंतर रिलायन्स पेट्रोकेमिकल ही रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये विलीन केली गेली आणि रिलायन्स इंडस्ट्रीज ही एक अवाढव्य कंपनी बनली.
* 2002मध्ये रिलायन्सला कृष्णा गोदावरी खोर्यामध्ये जगातील मोठ्या साठ्यांपैकी एक असा वायुसाठा सापडला.
* 2004मध्ये फॉर्च्यून 500 समूहांमध्ये समाविष्ट झालेली ही पहिली भारतीय कंपनी ठरली.
* 2005मध्ये पेट्रोकेमिकल व्यतिरिक्त इन्फ्रास्ट्रक्चर, विद्युत निर्मिती व पुरवठा, आर्थिक सेवा, टेलिकॉम अशा अनेक क्षेत्रांत कंपनीने आपले स्थान पक्के केले.
* 2006मध्ये रिलायन्सने रिलायन्स फ्रेश नावाने आपले रिटेल क्षेत्रात पदार्पण केले.
* 2010मध्ये रिलायन्सने इन्फोटेल ब्रॉडबँड सर्व्हिसेस लिमिटेडच्या अधिग्रहणासह ब्रॉडबँड सर्व्हिस मार्केटमध्ये प्रवेश केला. भारत सरकारद्वारे दिल्या जाणार्या 4 जी स्पेक्ट्रम लिलावासाठी हा एकमेव यशस्वी निविदादार होता.
आजच्या घडीला रिलायन्स ही भारतातील सर्वोच्च म्हणजे विक्रमी 15 लाख कोटी भांडवल मूल्य असलेली कंपनी म्हणून ओळखली जाते. तिच्या उपकंपन्या व त्यांचा व्यवसाय, विस्तार याबाबत पुढील लेखात पाहू.
बारा सत्रांमध्ये तेजी आणि एक आपटी
29 सप्टेंबरचा किरकोळ अपवाद वगळता मागील 12 सलग सत्रांमध्ये बाजाराने तेजी नोंदविली, परंतु गुरुवारी युरोपमध्ये पुन्हा लॉकडाऊन जाहीर झाल्याने गुंतवणूकदारांनी धास्तीपोटी शेअर्सची विक्री केल्याने जागतिक बाजारात पडझड झाली आणि त्याचेच पडसाद आपल्या बाजारातदेखील उमटले आणि सहा सत्रांमधील केलेली कमाई बाजाराने एकाच दिवसात घालवली. लिखिता इन्फ्रास्ट्रक्चर आपल्या आयपीओ किंमतपट्ट्यापेक्षा 8 टक्के वृद्धीने नोंदणीकृत झाला. सरकारने तातडीने एअर कंडिशन मशिनरीच्या आयातीवर निर्बंध घातल्याने व दिल्ली एनसीआरमधील एअर क्वालिटी इंडेक्स 330 पातळीवर गेल्याने एअर प्युरिफायरची वाढती मागणी लक्षात घेता ब्लू स्टार, व्होल्टास, व्हर्लपूल, हॅवेल्स यांना मागणी राहू शकते. तसेच एलआयसी आपला आयडीबीआय बँकेतील हिस्सा विकण्याच्या तयारीत असून त्यासाठी मंत्रिमंडळात मंजुरी मिळण्याच्या शक्यतेमुळे या बँकेचा शेअर 13 टक्क्यांहून अधिक उसळला. एकूणच पुढील महिन्यात असलेली अमेरिकेतील प्रतिष्ठेची अशी अध्यक्षीय निवडणूक, युरोपमधील लॉकडाऊन पाहता आपल्याकडील निर्देशांकांनी पुन्हा नवीन उच्चांक गाठणे सोपे वाटत नाही, परंतु दुसर्या तिमाहीच्या निकालांनी आणि सरकारी धोरणांनी काही करामत केल्यास ही शक्यतादेखील नाकारता येत नाही. निफ्टीसाठी 11900 व 12100 ह्या प्रतिकार पातळ्या, तर 11650 आणि 11250 या आधार पातळ्या म्हणून विचारात घेता येऊ शकतात.
सुपर शेअर – टाटा इलेक्सी
टाटा इलेक्सी ही कंपनी ऑटोमोटिव्ह, ब्रॉडकास्ट, कम्युनिकेशन्स आणि हेल्थकेअर यांसह अनेक क्षेत्रांमध्ये डिझाईन आणि तंत्रज्ञान सेवा देणार्या जगातील अग्रगण्य कंपन्यांपैकी आहे. आयओटी (इंटरनेट ऑफ थिंग्ज), क्लाऊड, मोबिलिटी, व्हर्च्युअल रिअलिटी आणि आर्टिफिशियल इंटेलिजन्स यांसारख्या डिजिटल तंत्रज्ञानाच्या डिझाईन व अनुप्रयोगांच्या माध्यमातून ग्राहकांना त्यांची उत्पादने आणि सेवा वृद्धिंगत करण्यास टाटा इलेक्सी मदत करते. मागील सोमवारी ह्या कंपनीचा शेअर एकाच दिवशी जवळजवळ 6 टक्के वधारला आणि त्याने आतापर्यंची सर्वोच्च भावपातळी नोंदविली. कंपनीचे उत्पन्न 11.5 टक्क्यांनी वाढून 430 कोटी रुपयांवर पोहोचले, तर येत्या वर्षात कंपनी काही मोठ्या कंपन्यांबरोबर वाटाघाटी करीत असून काही महत्त्वाच्या घडामोडी पूर्णत्वास येत आहेत असे जाहीर केल्याने गुंतवणूकदारांचा विश्वास वाढून कंपनीच्या शेअर्सची खरेदी झाल्याने हा शेअर मागील आठवड्यात जवळजवळ 140 रुपये वाढला. अजूनसुद्धा या शेअरमध्ये धुगधुगी शिल्लक असून दीर्घ मुदतीसाठी एका मूल्य दुरुस्तीमध्ये खरेदी करण्यास ही ऋणमुक्त कंपनी योग्य वाटते.
-प्रसाद ल. भावे (9822075888), sharpfinvest@gmail.com
RamPrahar – The Panvel Daily Paper