Breaking News

आगीशी खेळ

केवळ गैरसमजापायी एखाद्या चांगल्या योजनेचा बट्याबोळ कसा होतो याची उदाहरणे आपल्या देशात कमी अथवा नवीन नाहीत. एखाद्या योजनेचा हेतू चांगला असला तरी अंमलबजावणी मात्र वादग्रस्त ठरते. शेतकर्‍यांच्या कल्याणासाठी केंद्र सरकारने केलेले कायदे काही जणांच्या पचनी पडले नाहीत. त्यामुळे उभ्या राहिलेल्या लोकक्षोभापायी शेतकर्‍यांचे कल्याण करणारी एक चांगली योजना केंद्र सरकारला गुंडाळावी लागली. अल्पकालीन सैन्यभरतीसाठी केंद्र सरकारने नुकत्याच जाहीर केलेल्या अग्निपथ योजनेचे तसेच काही होणार का अशी भीती वाटू लागली आहे. उत्तर प्रदेश, बिहारसह काही राज्यांमध्ये तरुणांनी रस्त्यावर उतरून जाळपोळ करत नव्या अग्निपथ योजनेचा निषेध सुरू केला आहे. अग्निपथ योजनेंतर्गत चार वर्षांसाठी अग्निवीरांची भरती करण्यात येणार असल्याची घोषणा केंद्र सरकारने मंगळवारी केली होती. त्यानंतर सर्वप्रथम बिहारमध्ये निषेधाचा सूर उमटला. तेथील बहुतांश जिल्ह्यांमध्ये तरुणांनी रस्त्यांवर जाळपोळ केली. तसेच रेल्वेमार्ग देखील उद्ध्वस्त केले. आरा रेल्वेस्थानकावर तर एका रेल्वे इंजिनाला आग लावण्यात आली. उत्तर प्रदेशातदेखील दगडफेक, घोषणाबाजीचे प्रकार घडले. वास्तविक पाहता अग्निपथ ही अतिशय समयोचित आणि भविष्यवेधी योजना आहे. या योजनेमुळे तरुणांना उत्तम प्रशिक्षणासोबतच चांगली मासिक मिळकत उपलब्ध होईल. त्याचबरोबर सैनिकांना मिळणार्‍या काही सुविधा देखील उपलब्ध होतील. अग्निपथ ही योजना कोणालाही सक्तीची नाही. दरवर्षी 50 हजार अग्निवीरांची भरती करण्यात येणार असून ती नियुक्ती चार वर्षांसाठी असेल. त्यानंतर एखाद्या अग्निवीरास लष्करी सेवेमध्ये सामील होण्याची इच्छा असेल तर त्याला प्राधान्य दिले जाईल. इस्राइलसारख्या अनेक छोट्यामोठ्या देशांमध्ये तरुणांना किमान दोन वर्षांची लष्करी सेवा सक्तीची आहे. अर्थात या प्रशिक्षित अग्निवीरांना सरसकट सरहद्दीवर युद्धासाठी पाठवले जाईल असा काही त्याचा अर्थ होत नाही. लष्करामधील अनेक सेवा पिछाडीवर राहूनच पार पाडल्या जातात. तरुणांमध्ये राष्ट्रभक्तीचा जोश असतो, त्याला उत्तम वळण देऊ पाहणारी ही योजना आहे. या अग्निवीरांना चार वर्षांच्या सेवेनंतर सुमारे बारा लाखांचा सेवानिधी, बँक कर्ज योजनांचा लाभ आणि बारावीच्या समकक्ष प्रमाणपत्रही मिळणार आहे. अग्निवीरांच्या भरतीसाठी वयोमर्यादा 21पर्यंत होती. जनक्षोभ पाहून ही मर्यादा 23 करण्याचा निर्णय केंद्राने घेतला आहे. तथापि इतकी चांगली योजना असूनही तरुणांची प्रतिक्रिया सकारात्मक उमटली नाही हे आपले दुर्दैव म्हणावे लागेल. केवळ अज्ञानातून झालेले गैरसमज आणि संधीसाधू विरोधकांनी त्या गैरसमजांना घातलेले खतपाणी यामुळे जाळपोळीचे प्रकार बघावे लागले. अग्निपथ योजनेवर काँग्रेससह काही पक्षांनी निष्कारण टीका केली. तरुणांना अग्निपथावर चालायला लावू नका. तरुणांचा स्वप्नभंग करू नका. चार वर्षांच्या सेवेनंतर रोजगाराचे काय होणार असले आक्षेप विरोधकांनी घेतले आहेत. काँग्रेसचे खासदार राहुल गांधी यांनी तर वरिष्ठ लष्करी अधिकार्‍यांशी बोलून मगच अशी योजना आणायला हवी होती अशी टीका केली. मुळात ही योजना लष्करी अधिकार्‍यांनीच संपूर्ण अभ्यासाअंती तयार केली आहे ही मूलभूत माहिती देखील त्यांच्याकडे नसावी हे दुर्दैव. एखाद्या योजनेवर उलटसुलट चर्चा होणे हे सुदृढ लोकशाहीचेच लक्षण आहे. किंबहुना तशी चर्चा होणे आवश्यकच आहे. परंतु अज्ञानापोटी जाळपोळ आणि हिंसाचाराचा मार्ग अवलंबणे हा काही चर्चेचा भाग होऊ शकत नाही. शांतपणे विचार केला तर तरुणांना या योजनेतील लाभदायक कलमे दिसू लागतील.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply