Breaking News

आणखी किती बळी?

पुरोगामी महाराष्ट्रात आजही अधूनमधून जातिपातीच्या विद्वेषातून नवविवाहित जोडप्यांचे बळी जात आहेत, निव्वळ जातिपातीच्या भेदापायी आपल्याच अपत्याची हत्या करण्यापर्यंत संतापदग्ध पालक जात आहेत, हे कसे समजून घ्यावे? नगरमधील ऑनर किलिंगची ताजी घटना असो वा स्वत:च्याच कुटुंबियांविरोधात स्वसंरक्षणासाठी न्यायालयाची दारे ठोठावणार्‍या नवविवाहितांविषयीच्या बातम्या… हे सारेच विचारात पाडणारे आहे.

साडे तीन मुहुर्तांपैकी एक असलेल्या अक्षय्य तृतीयेच्या शुभमुहुर्तावर महाराष्ट्रभरात मंगळवारी अनेक जोडप्यांचे विवाह थाटामाटात पार पडले असतील. अक्षय्य तृतीया या दिवशी विवाह केल्यास नाते अक्षय्य टिकते असे मानले जाते. पण विवाह अक्षय्य टिकण्यासाठी, त्यातून आयुष्यभराची पावलोपावली साथ देणारी सोबत, सहजीवन फुलण्यासाठी खरोखरच निव्वळ पंचांगानुसारचा मुहुर्त आवश्यक असतो? की, उभयतांची एकमेकांसाठीची अनुरूपता, परस्परांवरील प्रेम आणि विश्वास हेच त्यांना जीवनभराच्या प्रवासातील असंख्य संघर्षमय क्षणातून तारून, एकत्रितपणे पुढे नेणार असते? परंतु आपल्याकडे विवाह जुळविताना नेमके हेच प्रेम आणि विश्वास… जुळेल नंतर आपोआप सहवासातून असे गृहित धरले जाते. आणि प्राधान्याने अनुरूपता तपासली जाते ती जातिधर्माची, शिक्षणाची आणि आर्थिक स्तराची. शिक्षण आणि आर्थिक स्तर सारखाच असावा याबाबतचा आग्रह एखादवेळ त्यामागच्या करकरीत व्यावहारिकतेच्या दृष्टिकोनातून समजून घेता येईलही. एकीकडे अफाट वेगाने भारतीय मानसिकता परंपरा आणि आधुनिकता यांची सांगड घालत सुटलेली नजरेस पडते. विवाहप्रसंगीच्या वधुवरांच्या पोशाखात तर हमखास परंपरा आणि आधुनिकतेचा मेळ दिसतो. ही आधुनिकता झपाट्याने स्वीकारत चाललेला आपला समाज, दोन प्रेमी जीवांनी जातिपातीचा भेद न जुमानता विवाहबंधनात अडकायचे ठरवले आहे हे कळताच फणा का काढतो? तरुण-तरुणींनी प्रेमात पडताना जात आधी तपासून घ्यावी या वडिलधार्‍यांच्या आग्रहाला काय म्हणावे? आणि त्यांचा हा आग्रह तरुण पिढीने धुडकावून लावला की आधीच्या पिढीचे माथे पार इतके बिघडते की चारचौघांसारखी सामान्य असणारी ही माणसे थेट कुणाची तरी हत्या करण्यापर्यंत जातात? सुखी सहजीवनासाठी नेमके काय-काय आवश्यक असते, जोडीदाराची निवड कशी करावी, प्रेमाच्या मायाजालात भ्रम आणि आभास किती आणि वास्तवात काय दिसते, यात मनाचा खेळ किती आणि शारीरिक ओढीचा हात किती यापैकी कशाकशाबद्दल आपण आपल्या तरुण पिढीशी काहीही बोलत नाही. आपल्या शिक्षणव्यवस्थेतही त्याबद्दल अवाक्षरही नाही. ज्याचे त्याने खाचखळग्यांतून जात पडत-धडपडत शिकावे वा आईवडिलांनी जातपात, व्यवहार आरखून-पारखून जोडी जुळवून दिलेल्या व्यक्तीसोबत आयुष्यभराचा संसार थाटावा, हीच आपली यासंदर्भातली नीती वा धोरण आहे. या धोरणाशी विसंगत वर्तन करणार्‍या, आईवडिलांच्या अधिकाराचा अधिक्षेप करून आपला जातिबाह्य जोडीदार निवडणार्‍या तरुण-तरुणींना नातेवाईक वा कुटंबीय थेट जीवे मारण्याच्या धमक्या देतात वा तसे खरोखरच करतातही. या रानटी, मागास वर्तनाच्या मागे आपले अपत्यप्रेम आहे की स्वत:च्या जातिपातीचा, समाजाचा अनाठायी, पोकळ अभिमान हे संबंधितांनी तपासून पाहण्याची नितांत आवश्यकता आहे. तरच पुरोगामी महाराष्ट्राच्या नावावर जमा होत चाललेल्या ऑनर किलिंगच्या घटनांना अटकाव होईल.

Check Also

ई-गव्हर्नन्समध्ये पनवेल महापालिका राज्यात प्रथम

पनवेल : रामप्रहर वृत्तमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या 150 दिवसांच्या प्रशासकीय सुधारणा कार्यक्रमांतर्गत ई-गव्हर्नन्स सुधारणांचा निकाल …

Leave a Reply