हरियाणा ः वृत्तसंस्था
जनतेच्या आशीर्वादाने हा चौकीदार शेतकर्यांना लुटणार्यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना जामिनासाठी कोर्टाचे आणि अंमलबजावणी संचालनालयाचे (ईडी) उंबरठे झिजवावे लागत आहे. त्यांना कारागृहाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून, पुढील पाच वर्षांत त्यांना तुरुंगात टाकू, असा इशाराच पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी रॉबर्ट वड्रा यांना दिला आहे.
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी हरियाणामधील फतेहाबाद येथे बुधवारी (दि. 8) सभा घेतली. त्यावेळी आपल्या भाषणात पंतप्रधान नरेंद्र मोदी म्हणाले की, पाच टप्प्यांमधील मतदान झाले असून, आता चित्र स्पष्ट झाले आहे. केंद्रात भाजपचीच सत्ता येणार आहे. काँग्रेस देशाच्या सुरक्षेबाबत काहीच बोलू शकत नाही. 2014पूर्वी पाकिस्तान दररोज सीमेवर कुरापती करीत होता. देशाच्या विविध भागांत दहशतवादी हल्ले व्हायचे, पण सरकार काहीच करीत नव्हते. तुम्ही देशाच्या सुरक्षेला भक्कम केल्याशिवाय जागतिक महासत्ता होऊ शकत नाही. काँग्रेस आणि त्यांच्या ‘महामिलावटी’ साथीदारांनी देशाच्या सुरक्षेबाबत भाष्य केले आहे का?, जे स्वत:च्या देशाचे रक्षण करू शकत नाही, ते दुसर्यांचे काय रक्षण करणार, असा सवालही मोदींनी या वेळी विरोधकांना केला.
आता आमच्या सरकारच्या कार्यकाळात सैन्याचे जवान दहशतवाद्यांच्या तळांवर घुसून दहशतवाद्यांचा खात्मा करतात. भाजपच्या काळात आधी सर्जिकल स्ट्राइक झाले आणि मग बालाकोट येथे एअर स्ट्राइक करण्यात आले. आमच्या सरकारने पाकिस्तानला मसूद अझहरवर कारवाई करण्यास भाग पाडले असून, सत्तेत असताना काँग्रेस सरकार अशी कारवाई का करू शकले नाही, असा सवालही त्यांनी उपस्थित केला. भारतमाता की जय, अशा घोषणा देण्यावर आक्षेप घेणार्या काँग्रेसने आता देशद्रोहाचे कलम रद्द करण्याचे आश्वासन दिले आहे. भारताला शिवीगाळ करणार्या, तिरंग्याचा अपमान करणार्या आणि नक्षलवाद्यांच्या समर्थकांना दिलासा मिळावा हेच काँग्रेसचे धोरण असल्याची टीका पंतप्रधान मोदी यांनी केली.रणरणत्या उन्हात, भर पावसात आणि कडाक्याच्या थंडीत पोलीस ड्यूटीवर असतात. स्वातंत्र्यानंतर देशभरात एकूण 33 हजार पोलीस शहीद झाले, पण काँग्रेसने कधी त्यांचा सन्मान केला नाही. जनतेच्या आशीर्वादामुळे हा चौकीदार शेतकर्यांना लुटणार्यांना न्यायालयापर्यंत घेऊन गेला आहे. आता त्यांना तुरुंगाच्या प्रवेशद्वारापर्यंत नेले असून, पुढील पाच वर्षांत ते तुरुंगात असतील, असा इशाराही पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी या वेळी दिला. आर्थिक गैरव्यवहाराप्रकरणी रॉबर्ट वड्रा अडचणीत आले असून, त्यांची ईडीमार्फत चौकशी सुरू आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper