दिसपूर : वृत्तसंस्था
ऑस्ट्रेलियात भारतीय संघाने मिळवलेल्या ऐतिहासिक विजयाचा हवाला देत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी विद्यार्थांना आत्मनिर्भर होण्याचा सल्ला दिला आहे. पंतप्रधान मोदींनी शुक्रवारी (दि. 22) आसाममधील तेजपूर विद्यापीठाच्या 18व्या दीक्षांत समारंभाला व्हिडिओ कॉन्फरन्सिंगद्वारे संबोधित केले. त्या वेळी ते बोलत होते.
केंद्रीय शिक्षणमंत्री रमेश पोखरियाल आसामचे राज्यपाल जगदीश मुखी, मुख्यमंत्री सर्बानंद सोनोवाल या वेळी उपस्थित होते. दीक्षांत समारंभात एकूण 1,218 विद्यार्थ्यांना पदवी आणि पदविका प्रदान करण्यात आली.
विद्यार्थांना संबोधित करताना मोदी म्हणाले की, अननुभवी आणि दुखापतग्रस्त असलेल्या संघाने न खचता निर्धार आणि ध्येयाने जगातील सर्वोत्तम संघाचा त्यांच्याच देशात पराभव केला. एक प्रकारे टीम इंडियाने सर्वांना आत्मनिर्भरतेचा वस्तुपाठ घालून दिला आहे. आपण सर्वांनी त्यांच्याकडून या गोष्टी शिकायला हव्यात.
आता आपण 75 वा स्वातंत्र्य दिन साजरा करीत आहोत. आताचे पदवी घेणारे विद्यार्थी भविष्यात देशाचा 100वा स्वातंत्र्य दिन साजरा करतील. या कालावधीत विद्यार्थ्यांनी आत्मनिर्भर भारत घडविण्याच्या दिशेने काम केले पाहिजे असे सांगून, भविष्यातील विद्यापीठे पूर्णपणे आभासी असतील आणि जगाच्या कुठल्याही भागातील विद्यार्थी कधीही कुठेही अभ्यास करू शकतील. अशा प्रकारच्या परिवर्तनासाठी नियामक चौकट असणे आवश्यक आहे आणि आम्ही नवीन शैक्षणिक धोरणाद्वारे हे लक्ष्य साध्य करण्यासाठी सातत्याने प्रयत्न करीत आहोत, असे पंतप्रधान मोदींनी सांगितले.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper