खारघर : प्रतिनिधी
श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ प्रस्तुत लोकमत आदर्श शिक्षक पुरस्कार वितरण सोहळा शुक्रवारी (दि. 13) पनवेलमधील आद्यक्रांतिवीर वासुदेव बळवंत फडके नाट्यगृहात रंगला. उल्लेखनीय कामगिरी करणार्या 43 शाळांमधील 45 शिक्षकांना या वेळी आदर्श शिक्षक पुरस्काराने माजी खासदार लोकनेते रामशेठ ठाकूर व अन्य मान्यवरांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले. या सोहळ्यास विद्यार्थी व नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.
आदर्श शिक्षकांचे कौतुक करण्यासाठी पनवेल महापालिकेचे सभागृह नेते परेश ठाकूर, प्रोग्रेसिव्ह ग्रुपचे चेअरमन विनोद त्रिवेदी, ‘लागीर झाले जी’फेम अभिनेता भैयासाहेब अर्थात किरण गायकवाड ‘लोकमत’च्या मुंबई आवृत्तीचे कार्यकारी संपादक विनायक पात्रुडकर, सहाय्यक उपाध्यक्ष विजय शुक्ला, कामगार नेते महेंद्र घरत, उपप्रादेशिक परिवहन अधिकारी हेमांगिनी पाटील, पंचायत समिती सदस्य रत्नप्रभा घरत, प्रभाग समिती अ अध्यक्ष शत्रुघ्न काकडे, नगरसेवक मनोहर म्हात्रे, अनिल भगत, नरेश ठाकूर, अजय बहिरा, नगरसेविका दर्शना भोईर, वृषाली वाघमारे, राजेश्री वावेकर, माजी सरपंच संतोष तांबोळी, सुरदास गोवारी, भीमसेन माळी, मंदार पनवेलकर, नरेश तोडेकर आदींसह विविध क्षेत्रांतील मान्यवर उपस्थित होते.
या वेळी लोकनेते रामशेठ ठाकूर यांनी गुणगौरव सोहळ्याचे कौतुक केले. शिक्षक हा प्रत्येकाला घडवत असतो. सध्याच्या घडीला विद्यार्थ्यांना घडविण्याची गरज नसून केवळ त्याच्या अंगी असलेल्या कलागुणांना चालना देण्याची गरज आहे, असे ते म्हणाले.
प्रोगेसिव्ह ग्रुपचे चेअरमन विनोद त्रिवेदी यांनी या सोहळ्याचे वर्णन करताना गुरू हेच परब्रह्म असून, गुणीजनांचा सत्कार ही अतिशय मोठी बाब आहे. आयुष्यात पालक आणि गुरू आपल्याला पुढे जाण्यासाठी नेहमी प्रोत्साहित करीत असतात. श्री. रामशेठ ठाकूर सामाजिक विकास मंडळ आणि ‘लोकमत’ने आयोजित केलेला हा पुरस्कार सोहळा कौतुकास्पद असल्याचे गौरवोद्गार काढले.
अभिनेता किरण गायकवाड यांनी या सोहळ्यास उपस्थित राहण्याची संधी दिल्याबद्दल आभार मानले, तसेच आपल्या शाळेतील आठवणींना उजाळा देत आयुष्यात शिक्षकांचे महत्त्व खूप असल्याचे सांगत त्यांच्यामुळेच आज सर्व जण या ठिकाणी उभे आहोत, असे सांगितले.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन स्मिता गवाणकर यांनी केले. या वेळी नृत्याविष्कार सादर करण्यात आले. त्याला उपस्थितांनी दाद दिली.
RamPrahar – The Panvel Daily Paper