कर्जत : बातमीदार
आदिवासी सेवा संघाच्या वतीने कर्जत तालुक्यातील एकनाथवाडीमधील सर्व आदिवासी कुटुंबांना दिवाळी निमित्त मिठाई तसेच विधवा व निराधार महिलांना धान्य आणि विद्यार्थ्यांना शालेय वस्तूंचे वाटप करण्यात आले. यावेळी आशा सेविका, अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांचा कोरोनायोध्दा पुरस्काराने सन्मान करण्यात आला.
आदिवासी सेवा संघांच्या माध्यमातून कर्जत तालुक्यातील साळोख ग्रामपंचायत हद्दीतील एकनाथवाडी येथे दिवाळी सणाची भेट देण्याचा कार्यक्रम आयोजित करण्यात आला होता. या वेळी आदिवासी भागात कोरोनाचा शिरकाव होऊ नये यासाठी कार्यरत असलेल्या ओलमण, साळोख आणि कळंब ग्रामपंचायतीमधील निर्मला विष्णू निर्गुडा, नंदा राजू सराई, मंदा बाळा भला, कुंदा दामा ढोले, छबी शंकर निर्गुडा, जयश्री ठोंबरे आणि ग्रामपंचायत सदस्या नीलम वसंत ढोले यांना कोरोनायोध्दा पुरस्काराने गौरविण्यात आले. तसेच आदिवासी कुटुंबांना किराणा साहित्य भेट देण्यात आले. या कार्यक्रमाला आदिवासी सेवा संघाचे जिल्हा अध्यक्ष बुधाजी हिंदोळा, जैतु पारधी, भास्कर कडाळी, यशवंत वाघ, ज्येष्ठ कार्यकर्ते चाहु सराई, सचिव गणेश पारधी, परशुराम पुंजारा, भगवान भगत, बाळू ठोंबरे, माजी सरपंच नागी आगीवले, परशुराम भला, मंगल निर्गुडा, नीरा कांबडी, मंगल बंगारे, पोलीस पाटील मारुती निर्गुडा, जनार्दन पारधी, बबन पुंजारा आदी उपस्थित होते. या कार्यक्रमासाठी एकनाथवाडीमधील श्रीराम कबड्डी संघाने पुढाकार घेतला होता.
RamPrahar – The Panvel Daily Paper