महाडमध्ये गोगावले समर्थकांचे शक्तिप्रदर्शन; राष्ट्रवादी काँग्रेसवरही टीका
महाड : प्रतिनिधी
आमदार भरत गोगावले यांना समर्थन देण्यासाठी महाडमध्ये गुरुवारी (दि. 30) शक्तिप्रदर्शन करण्यात आले. या वेळी आमदार गोगावले यांनी ऑनलाइन संबोधित करताना राष्ट्रवादी काँग्रेस आणि माजी खासदार अनंत गीते यांच्यावर जहरी टीका केली. आमच्यामुळेच गीते यांची ओळख असल्याचे भरत गोगावले यांनी स्पष्ट केले.
महाडमधील छत्रपती शिवाजी महाराज चौक येथे गुरुवारी सकाळी 11 वाजल्यापासून गोगावले समर्थक शिवसैनिक जमण्यास सुरूवात झाली होती. शिवाजी महाराज चौकात जमलेल्या समर्थकांना आमदार गोगावले यांनी आपली भूमिका डिजिटल माध्यमातून समजावून सांगितली. राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने जिल्ह्यात केलेल्या हस्तक्षेपामुळे आपल्याला हा निर्णय घेणे भाग पडले. तसेच संजय राऊत यांनी उद्धव साहेबांना फसवण्याचे काम केले, असे आमदार गोवावले यांनी या वेळी स्पष्ट केले. महापुरानंतर एकनाथ शिंदे यांनी केलेली मदत महाडकर विसरू शकणार नाहीत, असेही त्यांनी सांगितले.
आपल्या भाषणात युवा सेनेचे दक्षिण रायगड प्रमुख विकास गोगावले यांनी अनंत गीते यांच्यावर टीकेची झोड उठवली. आमच्या वाटेला गेलात तर सोडणार नाही, असे त्यांनी ठणकावून सांगितले.
शिवसेनेचे तालुकाप्रमुख सुरेश महाडिक, विजय सावंत, जिल्हा परिषदेचे माजी सदस्य जितेंद्र सावंत, संजय कचरे, मनोज काळीजकर, इक्बाल चांदले, डॉ.चेतन सुर्वे यांच्यासह पदाधिकारी व कार्यकर्ते या वेळी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper