पनवेल : प्रतिनिधी
पनवेल महापालिका झाल्याने व भविष्यातील नैना प्रोजेक्टमुळे येथील वस्ती बर्याच प्रमाणात वाढत आहे. दिवसेंदिवस वाहतुकीची समस्या जटिल होत आहे. राष्ट्रीय महामार्गावरून पुणे व कोकणात नवीन पनवेल, विचुंबे व उसर्ली या भागातून जाणार्यांना पोदीवरील भुयारी मार्ग आमदार प्रशांत ठाकूर यांनी लक्ष दिल्यामुळेच पूर्ण झाला. त्यामुळे येथील नागरिकांची वाहतूक कोंडीतून सुटका झाल्याने अनेक नागरिकांनी त्यांना धन्यवाद दिले.
नवीन पनवेलमधील सेक्टर 15, 15ए, पोदी न.1 व विचुंबे या भागातून गोवा आणि पुणे कडे जाणार्या वाहनांना राष्ट्रीय महामार्गावर जाण्यासाठी पोदीजवळील रेल्वे गेट ओलांडून किवा एचडीएफसी सर्कलच्या पूलावरून जावे लागते. या पुलावर वाहतुकीची कोंडी होत असते. कारण माथेरान रस्त्याकडून व डी मार्ट भागातून येणारी वाहतूक ही या पूलावरूनच होत असते. या भागाचा विकास झपाट्याने झाल्याने मोठे प्रकल्प उभे राहिले. वस्ती वाढल्याने वाहतूक वाढली त्याचा परिणाम रोज वाहतूक कोंडीला तोंड द्यावे लागते. त्यामुळे पोदी जवळ असलेल्या रेल्वे गेटचा वापर नागरिक व विद्यार्थी धोकादायक पद्धतीने करीत होते. त्यामुळे या भागात भुयारी मार्गाची मागणी करण्यात आली होती.
या भुयारी मार्गासाठी 10 कोट्यवधीपेक्षा जास्त खर्चाला मंजूरी मिळाली होती. हे काम डिसेंबर 2017 पासून बंद पडले होते. याबाबत नगरसेवक अॅड. मनोज भुजबळ आणि तेजस कांडपिळे यांनी आमदार प्रशांत ठाकूर यांना माहिती दिली असता आमदारांनी काम सुरू करण्यासाठी रेल्वे मंत्र्यांची भेट घेऊन काम पूर्ण करण्याची मागणी केली. आधुनिक पध्दतीने रेल्वे मार्गावर कोणताही ब्लॉक न घेता बांधलेल्या भुयारी मार्गाचे काम पूर्ण झाल्याने 24 सप्टेंबर 2020 मध्ये हा मार्ग सुरू करण्यात आला.
पोदीवरील भुयारी मार्ग सुरू झाल्याने आमच्या भागातील शाळेत जाणार्या मुलांना धोकादायक रेल्वे मार्ग ओलांडून जावे लागत नाही. त्यामुळे अपघातचा धोका टळला. त्याबद्दल अनेक पालकांनी माझ्याजवळ येऊन आमदार प्रशांत ठाकूर यांचे आभार मानले, असे माजी नगरसेवक तेजस कांडपिळे यांनी सांगितले.
नवीन पनवेल सेक्टर 15,16 आणि विचुंबे मधून पनवेल मध्ये जातांना वाहतूक कोंडीमुळे खूप वेळ लागतो. या भुयारी मार्गामुळे वेळ आणि बहुमूल्य इंधनाची बचत होणार आहे. नगरसेवक मनोज भुजबळ, तेजस कांडपिळे आणि रेल्वे मंत्र्यांकडे त्याचा पाठपुरावा करणारे आमदार प्रशांत ठाकूर यांच्यामुळे आमचा वेळ आणि पैसा वाचणार आहे त्याबद्दल त्यांना धन्यवाद, असे विचुंबे येथील वैशाली पाटील म्हणाल्या.
Check Also
केळवणे गावात भाजपची जोरदार पदयात्रा
पनवेल : रामप्रहर वृत्तकेळवणे गावात रविवारी (दि.25) भाजपची जोरदार प्रचार रॅली करण्यात आली आहे. रायगड …
RamPrahar – The Panvel Daily Paper