अलिबाग : प्रतिनिधी
मंत्री एकनाथ शिंदे गटातील शिवसेना बंडखोर आमदार महेंद्र दळवी यांच्या समर्थनार्थ मंगळवारी (दि. 28) अलिबागमध्ये आयोजित करण्यात आलेल्या मेळाव्याला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. या मेळाव्याद्वारे आमदार दळवी यांच्या समर्थकांनी जोरदार शक्तिप्रदर्शन केले.
अलिबागमधील चेंढरे येथे झालेल्या या मेळाव्यात ‘गर्व से कहो हम हिंदू है’, ‘शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांचा विजय असो’, ‘आनंद दिघेसाहेबांचा विजय असो’, ‘एकनाथ शिंदेसाहेब आगे बढो, हम तुम्हारे साथे है’, ‘महेंद्र दळवी अंगार है, बाकी सब भंगार है’, अशा घोषणा कार्यकर्ते देत होते. ‘मी आमदारांसोबत’ असे लिहिलेले फलकही कार्यकर्त्यांच्या हातात होते. बाळासाहेब ठाकरे, आनंद दिघे, एकनाथ शिंदे व आमदार महेंद्र दळवी यांची छायाचित्रे या फलकांवर होती. विशेष म्हणजे पाऊस असतानासुद्धा हे कार्यकर्ते मेळाव्यातून निघून न जाता भिजत उभे होते.
या मेळाव्यात सर्वच वक्त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या कार्यपद्धतीवर प्रामुख्याने खासदार सुनील तटकरे, पालकमंत्री आदिती तटकरे यांच्यावर नाराजी व्यक्त केली. ‘शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असले तरी ते नामधारी होते. उपमुख्यमंत्री अजित पवार हेच सर्व कारभार पाहतात. शिवसेनेच्या आमदारांना विकासनिधी दिला जात नव्हता. त्यामुळे मतदारसंघात विकासकामे होत नाहीत,’ अशी टीका आमदार महेंद्र दळवी यांच्या पत्नी व माजी जि. प. सदस्य मानसी दळवी यांनी केली.
मी आमदार महेंद्र दळवी यांची पत्नी म्हणून रायगड जिल्ह्यातील तीनही आमदारांच्या व्यथांची साक्षीदार आहे. त्यांनी स्वतःसाठी नाही, तर जनतेच्या हितासाठीच बंडाचे पाऊल उचलले आहे. आम्ही शिवसेना सोडलेली नाही. यापूर्वी आमदार दमदार होता. तो एका रात्रीत गद्दार कसा होतो, असा सवाल या वेळी मानसी दळवी यांनी व्यक्त केला. अॅड. सुशील पाटील, राजा केणी, उस्मान रोहेकर आदींचीही भाषणे झाली.
Check Also
रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा
भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …
RamPrahar – The Panvel Daily Paper