Breaking News

आमदार महेश बालदी यांच्या पुढाकाराने आदिवासी विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, मंत्री अशोक उईके यांच्या हस्ते बससेवेचे लोकार्पण

पनवेल : रामप्रहर वृत्त
उरण विधानसभा मतदारसंघाचे आमदार महेश बालदी यांच्या संकल्पनेतून आणि पुढाकारातून चौक विभागातील आदिवासी शालेय विद्यार्थ्यांसाठी मोफत बससेवा सुरू करण्यात आली असून या सेवेचा शुभारंभ विधान भवन येथे भाजप महाराष्ट्र प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण, राज्याचे आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांच्या हस्ते मंगळवारी (दि. 12) करण्यात आला. या सेवेमुळे विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा प्रवास सुखकर झाला आहे.
या लोकार्पण सोहळ्याला आमदार महेश बालदी, भाजपचे उत्तर रायगड जिल्हाध्यक्ष अविनाश कोळी, उपाध्यक्ष सुधीर ठोंबरे, माजी जिल्हा परिषद सदस्य मोतीराम ठोंबरे, खालापूर मंडळ अध्यक्ष प्रवीण मोरे, पनवेल पश्चिम मंडळ अध्यक्ष रूपेश धुमाळ, गणेश कदम यांच्यासह शिक्षक उपस्थित होते.
उरण विधानसभेचे कार्यसम्राट आमदार महेश बालदी यांनी आपल्या मतदारसंघातील आदिवासी समाजाच्या विकासासाठी लक्ष केंद्रित केले आहे. त्या अनुषंगाने त्यांच्यासाठी फिरता दवाखाना, घरकुल, सामाजिक सभागृह तसेच विविध पायाभूत सुविधा देण्याचे काम ते करत असून त्यांनी शालेय विद्यार्थ्यांच्या भविष्यासाठी आणि आदिवासी समाजाच्या विकासासाठी आणखी एक महत्त्वाचे पाऊल उचलले आहे. ही बससेवा कलोते मोकाशी ठाकूरवाडी, कलोते खोंडा ठाकूरवाडी, कलोते रयती ठाकूरवाडी या मार्गावर धावणार आहे. या उपक्रमामुळे संबंधित भागातील आदिवासी विद्यार्थ्यांना शालेय शिक्षणासाठी होणारी लांबची पायपीट थांबणार असून त्यांना सुरक्षित, सोयीस्कर व वेळेवर शाळेत पोहचण्याची सुविधा उपलब्ध झाली आहे. या सेवेमुळे केवळ शिक्षणाचा मार्ग सुलभ झाला नाही, तर आदिवासी समाजातील पालकांनाही आपल्या मुलांच्या शिक्षणाबाबत अधिक विश्वास आणि प्रोत्साहन मिळाला आहे. या उपक्रमासाठी जे.एम. बक्षी यांचे सहकार्य लाभले आहे.
आदिवासी समाज दुर्गम भागात राहतो. त्याला मुख्य प्रवाहात आणण्याचे काम अशा उपक्रमातून होत आहे. त्यामुळे आमदार महेश बालदी यांनी राबविलेला उपक्रम अत्यंत स्त्युत्य आणि प्रेरणादायी आहे, अशी प्रतिक्रिया प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांनी दिली; तर सामाजिक बांधिलकी जपण्याचे काम आमदार महेश बालदी यांनी केल्याचे गौरवोद्गार आदिवासी विकासमंत्री डॉ. अशोक उईके यांनी काढले. त्याचप्रमाणे या महत्त्वपूर्ण अशा सामाजिक उपक्रमाबद्दल आमदार महेश बालदी यांचे दोन्ही मान्यवरांनी कौतुक केले.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply