विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांची सीएमडींशी चर्चा

अलिबाग ः प्रतिनिधी
विधान परिषदेतील विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्या नेतृत्वाखालील शिष्टमंडळाने राष्ट्रीय केमिकल्स आणि फर्टिलायझरचे (आरसीएफ) अध्यक्ष व कार्यकारी संचालक (सीएमडी) निवास मुदगेरिकर यांच्याशी कर्मचारी भरती प्रक्रियेबाबत चर्चा केली. भरती प्रक्रियेत स्थानिक अलिबागकरांचाच विचार व्हावा, अशी आग्रही मागणी या बैठकीत करण्यात आली.
अलिबाग तालुक्यातील स्थानिकांना त्यातही प्राधान्याने प्रकल्पग्रस्तांना सामावून घेण्याच्या महत्त्वपूर्ण विषयावर त्याचबरोबर अर्जदाराची वयोमर्यादा आणि नवीन परीक्षार्थी यांना संधी अशा अनेक विषयांवर निवास मुदगेरिकर यांच्याशी चर्चा करण्यात आली. माजी मुख्यमंत्री तथा विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनीदेखील सीएमडींशी दूरध्वनीवरून चर्चा केली आणि या विषयात केंद्रीय मंत्री सदानंद गौडा यांनादेखील काही अडचण आल्यास सांगता येईल, असे सांगितले.
ऑनलाइन फॉर्म भरण्याची मुदत 15 तारखेऐवजी 31 जुलैपर्यंत वाढविणे, भरती प्रक्रियेतील वयोमर्यादा 25 ऐवजी 27 वर्षे करणे, परीक्षेच्या निर्णयाच्या गोंधळाचा विचार करून 30 जूनपर्यंत पास असण्याची अट काढून परीक्षेस बसलेले विद्यार्थी फॉर्म भरण्यास पात्र करणे, परीक्षेचा निकाल आल्यानंतर ते प्रमाणपत्र दाखल करून घेणे, फायर मॅन, बॉयलर ट्रेनी या जागांसाठी शिक्षण विचारात घेऊन प्रकल्पग्रस्तांना स्थानिक प्रशिक्षण देऊन या भरती प्रक्रियेत सामावून घेणे, या मागण्यांवर विचार करण्यात येईल, असे आश्वासन सीएमडी निवास मुदगेरिकर यांनी या वेळी दिले.
कार्यकारी निर्देशक एस. फिदवी, टेक्निकल डायरेक्टर सुधीर पाणदरे, धनंजय खामकर, भाजप दक्षिण रायगड जिल्हा अध्यक्ष अॅड. महेश मोहिते, तालुकाध्यक्ष परशुराम म्हात्रे, ज्येष्ठ नेते सतीश लेले, प्रकल्पग्रस्तांचे प्रतिनिधी संतोष सप्रे, बीएमएसचे सेक्रेटरी संदीप पाटील आदी या बैठकीला उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper