मुंबई : प्रतिनिधी
मुंबई उच्च न्यायालयाने अभिनेता शाहरूख खानचा मुलगा आर्यन खानसह अरबाज मर्चंट आणि मुनमुन धमेचा या तिघांना गुरुवारी (दि. 28) जामीन मंजूर केला आहे. या सर्वांना मुंबई क्रूझ ड्रग्ज प्रकरणात हा जामीन मिळाला. या सुनावणीकडे अनेकांचे लक्ष लागले होते. सर्वांचा युक्तिवाद पूर्ण झाल्यानंतर न्यायालयाने जामिनावर अंतिम निर्णय दिला. त्यामुळे आर्यन खानची दिवाळी तुरुंगात न जाता आपल्या घरी ‘मन्नत’वर जाणार हे स्पष्ट झालेय. आर्यन खानची बाजू मांडण्यासाठी भारताचे माजी अॅटर्नी जनरल आणि ज्येष्ठ वकील मुकुल रोहतगी यांच्यासह ज्येष्ठ वकील सतीश मानेशिंदे न्यायालयात हजर होते. तिन्ही आरोपींच्या वकिलांनी जामिनासाठी न्यायालयासमोर युक्तिवाद केला. एनसीबीच्यावतीने अतिरिक्त सॉलिसीटर जनरल अनिल सिंग यांनी बाजू मांडली. आर्यन खानच्या वकिलांनी दिलेल्या माहितीनुसार, न्यायालयाने दिलेल्या सविस्तर आदेशाची प्रत आणि त्याचा ऑपरेटिव्ह पार्ट शुक्रवारी हाती येणार आहेत. ते जेल प्रशासनाला दिल्यानंतरच आर्यन खानची सुटका होऊ शकणार आहे. जामीन मंजूर झाल्याचा निर्णय न्यायालयाने दिला असला, तरी कागदपत्रांची प्रक्रिया पूर्ण व्हायला वेळ लागू शकतो. त्यामुळे गुरुवारची रात्र आर्यन खानला जेलमध्येच काढावी लागली. दरम्यान, समीर वानखेडेंना उच्च न्यायालयाने तूर्तास दिलासा दिला आहे, तसेच न्यायालयाने समीन वानखेडे यांना अटक करताना तीन दिवस आधी नोटीस देण्याचे आदेश राज्य सरकारला दिले आहेत. आर्यन खान ड्रग्स प्रकरणात एनसीबी विभागीय संचालक समीर वानखेडे सध्या वादाच्या भोवर्यात सापडले आहेत. राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रवक्ते नवाब मलिक यांनी समीर आणि त्यांच्या कुटुंबावर विविध आरोप केले आहेत. त्यांच्या विरोधात चार तक्रारी देखील दाखल झाल्या आहेत. त्यामुळे वानखेडे यांची उच्च न्यायालयात धाव घेत आपल्याविरोधात कोणताही गुन्हा दाखल झाल्यास त्याचा तपास सीबीआयने करण्याची आणि कठोर करवाईपासून संरक्षण देण्याची मागणी केली होती.
किरण गोसावीला अटक
मुंबईत क्रूझवरील ड्रग्ज प्रकरणी संपूर्ण कारवाईदरम्यान समीर वानखेडेंसोबत असणारा साक्षीदार किरण गोसावीला पुणे पोलिसांनी फसवणुकीच्या गुन्ह्याखाली अटक केली आहे. दरम्यान, किरण गोसावीला न्यायालयात हजर केले असता न्यायालयाने त्याला आठ दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. न्यायाधीश आर. के. बाफना भळगट यांच्या कोर्टात ही सुनावणी झाली.
वानखेडेंची मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार
एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांनी केंद्रीय मागासवर्गीय आयोगाकडे तक्रार केली. आपण मागासवर्गीय असल्याने आपल्याला त्रास दिला जात आहे, अशी तक्रार वानखेडे यांनी दिली आहे. मागासवर्गीय असल्याने खोटे आरोप केले जात आहेत.
RamPrahar – The Panvel Daily Paper