नवी मुंबई : प्रतिनिधी
पुणे विद्यार्थी गृहाच्या नेरूळ येथील विद्याभवन शिक्षण संकुलाच्या प्राथमिक मराठी विभागाने आषाढी एकादशीनिमित्त सर्व विद्यार्थ्यांच्या सहाय्याने आरोग्य दिंडीचे आयोजन केले.
कोरोनानंतर दोन वर्षांनी नव्या जोमाने शाळेच्या सभागृहात आषाढी एकादशी साजरी करण्यात आली. यावर्षी आषाढी एकादशीचे औचित्य साधून आरोग्य दिंडी काढण्यात आली. कार्यक्रमाच्या सुरुवातीला पुणे विद्यार्थी गृहाचे संचालक दिनेश मिसाळ उपस्थितीत विठू माऊलीच्या पालखीचे पूजन करण्यात आले. दिंडीसाठी शाळेचे सर्व विद्यार्थी विविध रंगीबेरंगी पारंपारिक वारकरी पोशाखात आले. नेरूळमधील सर्व जनतेने भक्तीभावाने दिंडीचे स्वागत केले.
आरोग्यदिंडीमध्ये विद्यार्थ्यांची वारकरी पथक, आरोग्य सेवक पथक, लेझीम पथक, स्काऊट पथक, तसेच संत मंडळीचे पथक करण्यात आली होती. ढोल ताशांच्या गजरात ही आरोग्यदिंडी पायी चालत विठू नामाचा गजर करत तसेच आरोग्य विषयक घोषणा देत विठ्ठल मंदिराकडे गेली तेथे विठोबा रायाचे दर्शन घेऊन पुन्हा आरोग्य दिंडी शाळेच्या सभागृहात आली. कार्यक्रमात मान्यवरांनी विठू माऊलीची गाणी गाऊन विद्यार्थ्यांचा उत्साह वाढविला. शेवटी सर्वांना प्रसाद देवून दिंडीची सांगता झाली.
या कार्यक्रमासाठी संस्थेचे संचालक दिनेश मिसाळ, मुख्याध्यापिका सुवर्णा मिसाळ, मुख्याध्यापक राजेंद्र ढेरगे,ज्येष्ठ नागरिक ग्रंथालयाचे अध्यक्ष प्रकाश लखापते, माजी विद्यार्थी सुप्रिया देशपांडे तसेच सर्व शिक्षक व विद्यार्थी मोठ्या संख्येने उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper