
पोलादपूर : प्रतिनिधी
भारतीय दूरसंचार निगम लिमिटेडची (बीएसएनएल) इंटरनेट सेवा गेल्या आठवड्यापासून बंद असल्याने पोलादपूर पोस्ट ऑफिसमध्ये ग्राहकांना सेवा मिळत नाही. त्यामुळे या पोस्टातील कर्मचार्यांना असंख्य ग्राहकांची नाराजी ओढवून घ्यावी लागत आहे. पोलादपूर पोस्ट ऑफिसमध्ये 15 जानेवारीपासून बीएसएनएलची इंटरनेट सेवा अनियमित सुरू असून अनेकदा ही सुविधा ठप्प होत आहे. त्यामुळे स्पीड पोस्ट, टपालसेवा नोंदणी, बचत खाती तसेच अन्य टपालांची आणि आर्थिक व्यवहारांची नोंद ठेवणे शक्य होत नाही. परिणामी ग्राहकांसोबतच पोस्टाच्या सेव्हिंग योजनांचे एजंट्स हैराण झाले आहेत. यासंदर्भात निकिता शेठ यांनी पोस्ट मास्तरांकडे अधिक चौकशी केली असता त्यांनी सांगितले की, मुंबई -गोवा राष्ट्रीय महामार्ग चौपदरीकरणाच्या कामात बीएसएनएलची ऑप्टीकल फायबर केबल्स तुटून इंटरनेट सुविधा बंद होत असल्याची माहिती दूरसंचारच्या संबंधित अभियंत्यांकडून दिली जाते. संध्याकाळपर्यंत इंटरनेट सेवा सुरू होईल, असे दूरसंचारतर्फे रोज सांगण्यात येत असले तरी ही सुविधा ठप्पच असल्याचा अनुभव गेल्या आठवड्यापासून येत असल्याचे पोस्ट मास्तरांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper