माणगाव : प्रतिनिधी
तालुक्यातील विळे भागाड येथील पॉस्को कंपनीच्या अंतर्गत असणार्या इजिटेक या कंत्राटी कंपनीने 17 कामगारांना कोणतेही कारण न देता तडकाफडकी निलंबित केले आहे. आपल्यावर झालेल्या अन्यायाविरोधात या कामगारांनी सोमवारपासून कंपनीच्या मुख्य प्रवेशद्वारासमोर बेमुदत उपोषण सुरु केले आहे. ते बुधवारी तिसर्या दिवशीही सुरू आहे.
दरम्यान, मंगळवारी (दि. 15) रात्री परेश सदानंद जंगम (रा. महाड) या उपोषणकर्त्या कामगाराची प्रकृती खालावली. त्यांना माणगाव उपजिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर सुनील शिंदे या कामगारालाही बुधवारी रुग्णालयात हलविण्यात आले. मात्र इजिटेक कंपनीने या आंदोलनाची दखल घेतलेली नाही. शासकीय अधिकारी, स्थानिक लोकप्रतिनिधींनी या उपोषणाकडे पाठ फिरवली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper