Breaking News

‘उद्दिष्ट ठरवा, मेहनत करा यश निश्चित मिळेल’

खोपोलीत स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्राचे उद्घाटन

खालापूर : प्रतिनिधी

पोलीस भरतीसाठी पैसा किंवा हुशारी लागत नसून कठीण परिश्रमाची गरज आहे. त्यासाठी फेसबुक आणि व्हॉटसपवर वेळ न घालविता चांगले विचार ठेवा उद्दिष्ट ठरवा, यश निश्चित मिळेल, असे प्रतिपादन खोपोलीचे पोलीस उपनिरीक्षक अमोल वळसंग यांनी शनिवार (दि.2) येथे केले.

पोलीस भरतीसाठी मोफत मार्गदर्शन करण्याच्या उद्देशाने राज्यकर निरिक्षक राजेश पाटील यांनी खोपोलीत ध्येय्य अकॅडमी स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्र सुरू केले आहे. त्याचे उद्घाटन शनिवार जनता विद्यालयातील रामशेठ ठाकूर सभागृहात करण्यात आले. त्यावेळी अमोल वळसंग उपस्थितांना मार्गदर्शन करीत होते. 12 ते 18 हे कठीण परिश्रम करण्याचे वय आहे. ही पाच वर्षे मेहनत केल्यानंतर पुढील आयुष्य आनंदी जाईल, असे वळसंग यांनी सांगितले.

आपल्या भविष्यासाठी अभ्यास करा, ध्येय्य ठरवा यश निश्चित मिळेल. आम्ही लागेल ते सहकार्य करण्यास तयार आहोत, असे  सहाय्यक पोलीस निरीक्षक सतीश अस्वार म्हणाले. या वेळी पोलिसांत भरती होताना आलेले खडतर अनुभव आणि त्यावर मेहनतीने केलेली मात याबाबतचे अनुभव उपनिरीक्षक अमोल वळसंग आणि सहाय्यक निरीक्षक सतीश अस्वार यांनी सांगताच  उपस्थित विद्यार्थी व पालक काही वेळ निशब्द व भावूक झाले होते.

रवींद्र घोडके यांनी प्रास्ताविकात स्पर्धा परीक्षा मार्गदर्शन केंद्रांविषयी माहिती दिली. मार्गदर्शन केंद्र प्रमुख राजेश पाटील आणि जीएसटी इन्सपेक्टर अजित डेडे यांनी लेखी परीक्षेचा अभ्यास कसा करावा, मैदानी परीक्षेचा सराव कसा करावा, याबाबत मार्गदर्शन केले. 

Check Also

जि.प., पं.स. निवडणुकीत भाजप महायुतीचाच विजय होईल -परेश ठाकूर

पनवेल : रामप्रहर वृत्तशेतकरी कामगार पक्ष हा केवळ नावापुरताच पुरोगामी राहिला असून सत्तेसाठी कोणत्याही थराला …

Leave a Reply