Breaking News

उरणच्या आमसभेत विविध विषयांवर चर्चा

नागरी प्रश्नांसंदर्भात आमदार महेश बालदी यांचे अधिकार्‍यांना निर्देश

उरण ः वार्ताहर
उरण पंचायत समितीची आमसभा शुक्रवारी (दि. 28) आमदार महेश बालदी यांच्या अध्यक्षतेखाली जेएनपीटी मल्टिपर्पज हॉलमध्ये झाली. या आमसभेत विविध विषयांवर चर्चा झाली. नागरिकांचे प्रश्न सोडविण्यासाठी अधिकारीवर्गाने तत्परतेने कार्यवाही करावी, असे निर्देश आमदार महेश बालदी यांनी या वेळी दिले.
व्यासपीठावर आमदार महेश बालदी यांच्यासह तहसीलदार उद्धव कदम, पंचायत समितीचे गटविकास अधिकारी समीर वाठारकर, सहाय्यक पोलीस आयुक्त (पोर्ट विभाग) डॉ. विशाल मेहुल, उपजिल्हाधिकारी (मेट्रो सेंटर, उरण) जनार्दन कासार, उपजिल्हाधिकारी (एमएमआरडीए) संतोष जाधव, नगर परिषद मुख्यधिकारी समीर जाधव, वरिष्ठ पोलीस निरीक्षक जितेंद्र मिसाळ आदी उपस्थित होते. त्याचप्रमाणे विविध शासकीय, निमसरकारी तसेच विविध आस्थापनांच्या अधिकार्‍यांना आणि संबंधिताना आमसभेसाठी निमंत्रित करण्यात आले होते.
या आमसभेत तालुक्यातील विविध प्रश्नांवर चर्चा करण्यात आली. त्यामध्ये प्रामुख्याने सुसज्ज रुग्णालयाची गरज, वाहतूक कोंडी, अपघात, अनधिकृत बांधकामे, बेकायदा कंटेनर यार्ड, अतिक्रमण, विजेचा लपंडाव, पाणीटंचाई, भंगारवाले, उरण बायपास रोड, रेल्वे पार्किंग रेट कमी करणे, रेल्वेगाड्यांची वेळ वाढवणे, दिव्यांगांना ग्रामपंचायतीमधून मिळणारा पाच टक्के निधी, मच्छीमारांचे नुकसान, जि.प. शाळांची दुरवस्था, हेटवणे धरण पाणीपुरवठा आदी विषयांचा समवेश होता. याशिवाय मोकाट कुत्रे व माकडांपासून होणारा त्रास, हनुमान कोळीवाडा पुनर्वसन प्रश्न, पुनाडे धरणातील गाळ व लिकेज यावर चर्चा करण्यात आली.
उरण तालुक्यात नागरिकांना भेडसावणार्‍या समस्या सोडविण्याचा माझा प्रयत्न राहील, असे आश्वासन आमदार महेश बालदी यांनी आमसभेस संबोधित करताना दिले.
या आमसभेस न्हावाशेवा वरिष्ठ पोलीस निरीक्षक ओवे, वाहतूक पोलीस निरीक्षक दहिफळे, भाजपचे उरण तालुका अध्यक्ष रवी भोईर, शहर अध्यक्ष कौशिक शाह आदी पदाधिकारी, ग्रामपंचायतींचे सरपंच, उपसरपंच, सदस्य, कार्यकर्ते, नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply