दोन लहानग्यांना चावा; नवी मुंबईत उपचार सुरू
उरण : प्रतिनिधी, वार्ताहर
उरण तालुक्यातील कंठवली गावात दोन चिमुकल्या मुलींना भटक्या कुत्र्याने चावा घेतल्याची घटना घडली असून या जखमी मुलींना तालुक्यातील दोन्ही शासकीय रुग्णालयांत उपचार न मिळाल्याने नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
कंठवली गावातील मैथिली विनोद ठाकूर (वय 3) व ईशा संतोष ठाकूर (वय 3) या दोघी घराजवळील अंगणात खेळत असताना भटक्या कुत्र्याने या मुलींचा चावा घेतला. त्यांचा आरडाओरडा ऐकल्यानंतर ग्रामस्थांनी दोन्ही मुलींना कुत्र्याच्या तावडीतून सोडविले आणि त्यांना उपचारासाठी त्यांच्या आई-वडिलांनी कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेले, पण तेथील डॉक्टरांनी इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात जा असा सल्ला दिला. त्यानंतर इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात गेले असता या रुग्णालयात मुलींवर उपचार होणार नाहीत, तुम्ही इतर रुग्णालयात घेऊन जा, असा सल्ला दिला गेला. अखेर या मुलींना नवी मुंबईतील रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.
दोन मुलींवर कोप्रोली प्राथमिक आरोग्य केंद्रात नेण्यात आल्यानंतर तेथे त्यांच्यावर उपचार होणे गरजेचे होते. जर उपचार झाले नसतील, तर या प्रकरणी मी माहिती घेऊन कार्यवाही करतो.
-डॉ. राजेंद्र इटकर, वैद्यकीय अधिकारी, उरण
या मुलींवर प्राथमिक कोप्रोली आरोग्य केंद्रात उपचार होणे गरजेचे होते, परंतु प्राथमिक आरोग्य केंद्रातील डॉक्टर हे सर्पदंश, कुत्रा चावल्यानंतर किंवा इतर रुग्णांनाही इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालयात पाठवितात. त्या रुग्णालयात त्यांच्यावर तात्पुरते उपचार करून पुढील रुग्णालयात जाण्याचा सल्ला रुग्णालयाकडून देण्यात आला आहे.
-गौतम देसाई, वैद्यकीय अधीक्षक, इंदिरा गांधी ग्रामीण रुग्णालय, उरण
RamPrahar – The Panvel Daily Paper