40 वाहनांवर गुन्हे दाखल
उरण : प्रतिनिधी – उरण तालुक्यात कोरोना संसर्गजन्य विषाणूच्या व्हायरसचा फैलाव आत्ता दुप्पटीने वाढला असूनही शहरातील बाजरपेठेत नागरिकांची दैनंदिन होणारी गर्दी कमी होत नसल्याने आत्ता शहरात येणार्या आणि परिसरातील मार्गांवर हेल्मेट वापरणे, मास्क न लावणे, वाहन चालवितांना मोबाइलचा वापर करणे, वाहन चालविण्याचा परवाना नसणे अशा प्रकारच्या वाहनचालकांवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई करण्यात आली. त्याचप्रमाणे काही दुचाकी स्वरांवर कलम 188 प्रमाणे कारवाई करण्याचा उपक्रम रविवारी उरण वाहतूक शाखा व उरण पोलीस ठाणे यांच्या संयुक्त विद्यमाने करण्यात आला.
उरण शहरात होणारी नागरिकांची गर्दी कमी व्हावी, त्याच प्रमाणे कोरोना संसर्गाचा प्रादुर्भाव सध्या मोठ्या प्रमाणात फोफाऊ लागल्याने नागरिकांच्या सुरक्षेसाठी दुचाकी वाहनांची अधिक गर्दी होत असल्याने या गर्दीमध्ये एखाद्या कोरोना बाधित व्यक्तीचा शिरकाव झाल्यास परिस्थिती हाताबाहेर जाईल याची दक्षता घेण्यासाठी शहरात गर्दी करणार्या नागरिकांनाही विनाकारण न फिरण्याचे आवाहनही पोलिसांनी केले आहे.
याशिवाय दुचाकी वाहनांची वर्दळ कमी करण्यासाठी रविवारी उरण वाहतूक शाखेचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक माणिक नलावडे, उरण पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक जगदीश कुलकर्णी, गुन्हे पोलीस निरीक्षक अतुल आहेर, सहाय्यक पोलीस निरीक्षक व्ही. जी. कावळे, सहाय्यक पोलीस निरीक्षक वृषाली पवार यांच्यासह पोलीस कर्मचारी यांनी केलेल्या संयुक्त कारवाईत एकूण 275 दुचाकींवर ऑनलाइन दंडात्मक कारवाई केली. याशिवाय 40 दुचाकी वाहनांवर कलम 188 प्रमाणे गुन्हे दाखल करून ही वाहने पोलिसांनी ताब्यात घेतली आहेत.
कोरोना संसर्गाच्या वाढत्या संख्येच्या पार्श्वभूमीवर वाहनांवर करण्यात आलेल्या कारवाईमुळे काही प्रमाणात वाहन चालकांना वाचक बसेल, अशी आशा व्यक्त करण्यात येत असून, मागील साडेतीन महिने पोलीस प्रशासनाकडूनच ठिकठिकाणच्या नागरिकांना सुरक्षित अंतर पाळण्यासाठी समजावून सांगण्याचे काम याच पोलीस यंत्रणेने केले आहे. त्यामुळे आत्ता तर उरण तालुक्यात कोरोनाने कहर केला असून, त्याच्या संख्येत लक्षणीय वाढ होतांना दिसत असल्याने येथील पोलीस यंत्रणा आत्ता आक्रमक झाली असून, गर्दी कमी करण्यासाठी पोलिसांनी कारवाईचा बडगा उगारला आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper