शनिवारी आयुक्तांकडून होणार सुरक्षा तपासणी
उरण ः प्रतिनिधी
मागील 27 वर्षे प्रतिक्षेत असलेला बहुचर्चित खारकोपर ते उरण हा लोकलचा रेल्वेमार्गाचा प्रकल्प मार्च अखेरपर्यंत सुरू करण्यासाठी सिडको व मध्यरेल्वे प्रशासनाच्या हालचालींना वेग आला आहे. त्यासाठी शनिवारी (दि. 4) व सोमवारी (दि. 6)रेल्वेसुरक्षा आयुक्त या मार्गाची पाहणी करणार आहेत. या मार्गावरील उरण, द्रोणागिरी (बोकडविरा), न्हावा-शेवा (नवघर), रांजणपाडा व गव्हाण (जासई) ही स्थानके पूर्णत्वास जात आहेत. येथील प्लॅटफॉर्म, वाहनतळ, तिकीटघर आदींची कामेही रात्रंदिवस सुरू आहेत. जासई – गव्हाणदरम्यान वनक्षेत्रातील जागेच्या भू-संपादनाला अधिक विलंब झाल्याने मागिल दोन वर्षाच्या कालावधीत उरण- खारकोपर या रेल्वे मार्गाचा प्रारंभ होण्याच्या डेडलाईन हुकल्या होत्या, मात्र आता प्रत्यक्ष उरण-खारकोपर रेल्वेसेवा प्रत्यक्षात उतरवण्यासाठी सिडको आणि मध्यरेल्वे प्रशासनाचे प्रयत्न सुरू आहेत. त्याचप्रमाणे उरण स्थानकातील पॉवर हाऊस व यार्डाची ही काम वेगाने सुरू आहे. उरण ते खारकोपर प्रकल्पाचे काम लवकरच पूर्ण होईल अशी माहीती मध्यरेल्वेच्या जनसंपर्क अधिकारी पी. डी. पाटील यांनी दिली आहे, तर उरण ते खारकोपर हा मार्ग सुरू झाल्यानंतर हा कॉरिडॉर पूर्ण होईल आणि उरणला सीएसएमटीशी जोडले जाईल. त्यामुळे उरण ते सीएसएमटी मुंबई असा प्रवास येथील प्रवाशांना करता येणार आहे. त्यामुळे मागील अनेक वर्षे या रेल्वेमार्गाच्या प्रतीक्षेत असलेल्या प्रवाशांनी प्रतिक्षा आत्ता निश्चितच पूर्णतःवास जाणार असल्याने प्रवासी आणि शाळा कॉलेजातील विद्यार्थ्यांमध्ये समाधान व्यक्त होत आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper