उरण : प्रतिनिधी
उरण शहरातील विमला तलाव येथे कोकण मराठी साहित्य परिषद, मधुबन कट्ट्याची दर महिन्याच्या 17 तारखेला सातत्याने कविसंमेलने होत असतात. याच कार्यक्रमाचे औचित्य साधून राज्यातील प्रगल्भ कवींच्या लेखणीचे कौतुक करण्याच्या हेतूने कट्ट्याचे संस्थापक तथा कोकण मराठी साहित्य परिषदेचे जनसंपर्क प्रमुख प्रा. एल. बी. पाटील यांच्या आधिपत्याखाली मधुबन कट्ट्याच्या 51व्या कविसंमेलनानिमित्त 17 डिसेंबर 2019 रोजी एन. आय. हायस्कूल उरण, विमला तलाव येथे राज्यस्तरीय काव्यस्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.
ही स्पर्धा राज्यातील मराठी भाषकांसाठी खुली ठेवण्यात आली असून, सादर होणारी कविता तीन मिनिटांच्या अवधीत उरकायची आहे, तसेच स्पर्धकांनी पाठविलेलीच कविता कवीला सादर करावी लागणार आहे. कवितेला विषयाचे बंधन नाही, मात्र ती अश्लील असू नये. स्पर्धकाने एकच कविता आपले नाव पत्ता, व्हॉट्सअॅप नंबरसह 5 डिसेंबर 2019 पूर्वी पाठवावी. या स्पर्धेत पहिल्या 80 स्पर्धकांनाच सहभागी होता येईल. स्पर्धकांना 300 रुपये प्रवेश फी ठेवण्यात आली असून, ती 12 डिसेंबरपर्यंत भरावयाची आहे.
या राज्यस्तरीय काव्य स्पर्धेत प्रथम क्रमांकास 15 हजार रुपये, द्वितीय क्रमांकास 10 हजार रुपये, तृतीय 7 हजार रुपये, तर चतुर्थ कामांकाला 5 हजार रुपये आणि पाचव्या क्रमांकास 3 हजार रुपये, शिवाय उत्तेजनार्थ सहा स्पर्धकांना प्रत्येकी दोन हजार रुपये स्मृतिचिन्ह आणि प्रमाणपत्र व इतर बक्षिसे देणार असल्याची माहिती प्रसिद्धीस दिलेल्या पत्रकात नमूद करण्यात आली आहे. स्पर्धेसाठी कविता व 300 रुपये फी मच्छिंद्र काशिनाथ म्हात्रे (मु. पो. वशेणी, ता. उरण, जि. रायगड मो. 9819652951) यांच्याकडे पाठवाव्यात, असे आवाहन कोकण मराठी साहित्य परिषदेच्या वतीने करण्यात आले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper