
पनवेल : वार्ताहर
राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेच्या उलवे येथील न्यू इंग्लिश स्कूलमध्ये माजी विद्यार्थी किरण एकनाथ मढवी याने विद्यालयाशी बांधिलकी जपत 31 गरीब, गरजू विद्यार्थी दत्तक घेतले. या दत्तक विद्यार्थ्यांचा वर्षभर होणारा शैक्षणिक खर्च याची जबाबदारी त्याने घेतली आहे. त्याचप्रमाणे चिरंजीव वरदच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्यार्थ्यांना शालेय गणवेश आणि शैक्षणिक साहित्याचे वाटप केले. या कार्यक्रमास स्थानिक सल्लागार समिती सदस्य आणि सेवानिवृत्त आदर्श शिक्षक मोतीराम मढवी गुरुजी, समालोचक व वक्ते दिनेश पाटील, शिवसंघर्ष प्रतिष्ठानचे संस्थापक अध्यक्ष अखिलकुमार यादव, युवा नेते निलेश खारकर, विद्यालयाचे स्थानिक सल्लागार समिती चेअरमन शरद खारकर, जाणीव सामाजिक संस्थेचे अध्यक्ष आणि स्थानिक सल्लागार समिती सदस्य सुनील ठाकूर, जितेंद्र कुमार, कुलदीप तिवारी आदी उपस्थित होते. गुरुकुल प्रमुख व्ही. जी. पाटील यांनी उपस्थित मान्यवरांचे स्वागत केले, तर मुख्याध्यापक एस. के. पाटील यांनी प्रास्ताविक केले. या वेळी किरण मढवी यांचे सामाजिक कार्याबद्दल उपस्थित मान्यवरांनी कौतुक करून त्यांना धन्यवाद दिले. किरण यांनी आपल्या मनोगतातून विद्यार्थ्यांना व शिक्षकांना राष्ट्रीय शिक्षण दिनाच्या शुभेच्छा दिल्या. कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी एस. आर. गावंड, व्ही. व्ही. गावंड, एस. डी. पाटील या शिक्षकांनी सहकार्य केले. व्ही. जी. पाटील यांनी उपस्थित मान्यवर व किरण मढवी यांचे विद्यालयाच्या वतीने आभार मानले.
RamPrahar – The Panvel Daily Paper