नवी मुंबई : रामप्रहर वृत्त
वाशी येथील मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीला (एपीएमसी) यंदा वार्षिक उलाढालीत दोन कोटी 21 लाख रुपयांचा तोटा सहन करावा लागला आहे. निवडणूक, सातवा वेतन आयोग, स्वेच्छानिवृत्ती या आस्थापनांवर नऊ कोटी 22 लाख रुपये खर्च झाले आहेत. त्यामुळे एकूण उत्पन्न 103.15 कोटी तर खर्च 105.36 कोटी झाला आहे.
2018-19मध्ये सरासरी वार्षिक उत्पन्न 100.55 कोटी, तर 94.44 कोटी खर्च झाला होता. यंदा खर्चात वाढ झाल्याची नोंद करण्यात आली. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा दोन कोटी 60 लाखांची उत्पन्नात वाढ झाली असली तरी आस्थापना खर्चात वाढ झाल्याने बाजार समितीच्या संचालक मंडळ निवडणुकीत 84 लाख खर्च तर स्वेच्छानिवृत्ती, सातवा वेतन आयोग या आस्थापनांत नऊ कोटी 22 लाख खर्च झाला आहे.
मार्चच्या अखेरीस राज्यात टाळेबंदी घोषित झाली. त्यामुळे बाजारातील सर्व व्यवहार जवळपास ठप्प होते. कोरोनाच्या भीतीने 60 ते 70 टक्के व्यापार बंद ठेवण्यात आला होता. त्यामुळे या दोन महिन्यांत मासिक उत्पन्नात दोन ते अडीच कोटींची उलाढाल कमी होईल, असा अंदाज व्यक्त करण्यात येत आहे. दरमहा उलाढाल सरासरी 8 ते 9 कोटी असून सहा कोटी रुपये बाजार शुल्क प्राप्त होते.
मुंबई कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उलाढालीत 70 ते 75 टक्के बाजार शुल्क ही जमेची बाजू आहे. यंदा पाच कोटी 63 लाख रुपयांनी वाढ झाली आहे. 2018-19 मध्ये 67.21 कोटी तर 2019-20 मध्ये 72. 84 कोटी बाजार शुल्क मिळाले.
कोरोनाकाळात जमा-खर्चाचा तपशील काढण्यास विलंब झाला. मागील वर्षीच्या तुलनेत यंदा बाजार शुल्कात वाढ झाली आहे. येत्या काळात समितीला काही प्रमाणात तोटा सहन करावा लागणार आहे.-अनिल चव्हाण, सचिव एपीएमसी
RamPrahar – The Panvel Daily Paper