ठाणे : प्रतिनिधी
जागतिक मातृभाषा दिन 21 फेब्रुवारी रोजी साजरा केला जातो. या दिनाचे औचित्य साधून ठाण्यातील वाघबीळ गावातील प्रा. सागर पाटील यांनी एमबीएच्या विद्यार्थ्यांना क्रीएटीव्हीटी अॅण्ड इनोवेटीव्ह मॅनेजमेंट या विषयाचे धडे चक्क आगरी भाषेतून दिले. प्रा. पाटील हे गेले 12 वर्ष एमबीएच्या मुलांना शिकवत असून अनेक महा विद्यालयात त्यांनी व्याख्याने दिली आहेत.प्रा. पाटील यांना त्यांच्या आगरी भाषेचा जाज्वल्य अभिमान असल्याचे त्यांनी सांगितले. गेल्या 13 वर्षांत आगरी-कोळी समाजाच्या व्यापीठावर गेल्यावर त्यांनी बोली भाषेतच भाषण केले आहे. बरेच आगरी पालक आपल्या पाल्याला आगरी बोली भाषा शिकवायला टाळतात, पण एक व्यक्ती जीवनात सात ते आठ भाषा शिकू शकत असेल तर त्यामध्ये आगरी बोली भाषेचा समावेश का नसावा, असा प्रश्न प्रा. पाटील यांनी उपस्थित केला. या पुढे सुद्धा आगरी बोली भाषेच्या प्रचारासाठी प्रयत्न करणार असल्याचे प्रा. पाटील यांनी सांगितले.
RamPrahar – The Panvel Daily Paper