नेरळ लब्धी गार्डन असे नामकरण; प्रवासीवर्गात संतप्त प्रतिक्रिया
कर्जत : बातमीदार
मध्य रेल्वेच्या दफ्तरी जंक्शन रेल्वे स्थानक अशी नोंद असलेल्या नेरळ स्थानकाचे नाव एम इंडिकेटरवर नेरळ-लब्धी गार्डन असे दर्शविले जात आहे. त्याबद्दल नेरळमधील प्रवाशांनी संताप व्यक्त केला आहे. ब्रिटिशांनी भारतात पहिल्यांदा रेल्वे आणली. त्यानंतर केवळ तीन वर्षांनी नेरळ या स्थानकात रेल्वेगाडी आली आहे. 1856मध्ये बोरीबंदर-ठाणेदरम्यान रेल्वे सुरु झाली आणि 1859मध्ये नेरळच्या मालधक्क्यावर रेल्वेगाडी पोहचली होती. मुंबईतील आदमजी पीरभॉय यांनी नेरळ येथून माथेरानला जाण्यासाठी नॅरोगेज मार्ग शोधून काढला आणि नेरळ हे 1907मध्ये जंक्शन रेल्वेस्थानक बनले. माथेरान या पर्यटनस्थळासाठी याच स्थानकातून मिनीट्रेन सोडली जाते. असे महत्त्व असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकाची माहिती एम इंडिकेटरवर नेरळ-लब्धी गार्डन अशी दाखविली जात आहे. लोकल गाड्यांचे बदललेले वेळापत्रक याची माहिती प्रवासी एम इंडिकेटरवरून घेत असतात. या एम इंडिकेटरवर नेरळ स्थानकांच्या पुढे असलेला जंक्शन हा शब्द गायब झाला असून तेथे लब्धी गार्डन असे दर्शविले जात आहे. त्यात लब्धी गार्डन हा गृहप्रकल्प नेरळ स्थानकापासून चार किलोमीटर अंतरावर असून तो प्रकल्प नेरळ ग्रामपंचायत हद्दीतदेखील नाही. त्यामुळे एम इंडिकेटरवरील नेरळ लब्धी गार्डन या नावाबद्दल नेरळ प्रवासी संघटनेने संतप्त प्रतिक्रिया दिली आहे. आमच्या स्थानकाचे नाव बदलण्याचा अधिकार एम इंडिकेटरला कोणी दिला. खासगी संस्थांची नाव ऐतिहासिक महत्त्व असलेल्या नेरळ रेल्वेस्थानकाच्या नावापुढे असून ते नाव तत्काळ काढण्यात यावे, अशी मागणी प्रवासी संघटनेचे अध्यक्ष संदीप म्हसकर यांनी केली आहे. एम इंडिकेटर यांना जर नेरळ स्थानकाचे नाव बदलायचे असेल, तर हुतात्मा हिराजी पाटील रेल्वेस्थानक असे दर्शवावे, अशी सूचनादेखील म्हसकर यांनी केली आहे.
नेरळ नावापुढे लब्धी गार्डन हे दिसत आहे. परंतु ती जाहिरात असून नेरळ रेल्वे स्थानक जंक्शन स्थानक हे नाव कायम आहे. लब्धी गार्डन असे बदलले नसून ती जाहिरात आहे, हे समजून घ्यावे.
-सचिन टेके, निर्माते, एम-इंडिकेटर
RamPrahar – The Panvel Daily Paper