थकीत वेतनासाठी आंदोलन; महाविकास आघाडी सरकारचा जाहीर निषेध
मुंबई : प्रतिनिधी
महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळाच्या एक लाख 10 हजार कर्मचार्यांच्या तीन महिन्यांच्या थकीत वेतनासाठी एसटी कामगार संघटनेने सोमवारी (दि. 9) राज्यभर आक्रोश आंदोलन केले. या वेळी राज्य सरकारचा निषेध करण्यात आला. अशातच राज्यामध्ये दोन एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्याच्या घटना समोर आल्याने आंदोलकांमध्ये सरकारविरोधात संतापाची लाट उसळली आहे.
कोरोनाच्या काळात सोयी-सुविधांचा अभाव असतानाही एसटी कर्मचारी जीव धोक्यात घालून सेवा बजावत आहेत. त्यामुळे बरेचसे कर्मचारी कोरोनाबाधित झाले. प्रतिकूल परिस्थितीत काम करीत असतादेखील या कर्मचार्यांना तीन महिन्यांचे वेतन मिळाले नाही. त्यामुळे संतापलेल्या कर्मचार्यांनी सोमवारी घरासमोरच कुटुंबीयांसमवेत आक्रोश आंदोलन केले. आंदोलनाच्या दणक्यानंतर परिवहनमंत्री अनिल परब यांनी एसटी कर्मचार्यांना एक महिन्याचे वेतन देण्याची घोषणा केली.
आता तरी सरकारने जागे व्हावे -फडणवीस
वेतन न मिळाल्याने दोन एसटी कर्मचार्यांनी आत्महत्या केल्या. या अतिशय वेदनादायी, मनाला अस्वस्थ करणार्या घटना आहेत. एसटी कर्मचार्याच्या व्यथा व वेदनासंदर्भात सातत्याने पत्रव्यवहार करूनसुद्धा राज्य सरकारने त्याकडे लक्ष दिले नाही. ऐन दिवाळीच्या तोंडावर ही दोन कुटुंबं उघड्यावर आली आहेत. आता तरी राज्य सरकारने जागे व्हावे, असे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी म्हटले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper