Breaking News

एस.टी.ची 71 वर्षे

महाराष्ट्र राज्य परिवहन मंडळ म्हणजेच आपल्या एस.टी. महामंडळाची पहिली बस रस्त्यावर धावली त्याला 1 जून रोजी 71 वर्षे पूर्ण झाली. आज आपण या महामंडळामध्ये अनेक स्थित्यंतरे झालेली पाहत आहोत.  या मंडळाचे अध्यक्षपद  पदसिध्द अध्यक्षपद परिवहन मंत्र्यांकडेच असल्याने आता ना. दिवाकर रावते मंडळाच्या अध्यक्षपदी आहेत. व्यवस्थापकीय संचालकपदी आय. ए. एस. अधिकारी रणजितसिंह देओल आहेत. खाजगी वाहतुकीच्या स्पर्धेत टिकण्यासाठी एस.टीमध्ये अनेक  बदल केलेले आपल्याला पाहायला मिळत आहेत. वाहक म्हणून महिलांची भरती करण्यात आली.  सामान्य प्रवाशाला कमीत कमी भाड्यात वातानुकूलित बसचा प्रवास घडवण्यासाठी सुरू केलेली  शिवशाही  हा त्याचाच एक भाग आहे. बीएसआरटीसीची पहिली बस 1 जून 1948 या दिवशी पुणे ते अहमदनगर या मार्गावर धावली. सदरची बस पुणे येथील पहिले चालक तुकाराम पांडुरंग पठारे व वाहक लक्ष्मण केवटे यांनी चालवली.  पहिल्या एसटी बसची बॉडी आजच्यासारखी लोखंडी नव्हती. ती लाकडी होती. वरील छप्पर कापडी होते. सकाळी आठ वाजता तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस अहमदनगरहून  पुण्याकडे रवाना झाली. अहमदनगर ते पुणे या प्रवासाचे तिकीट फक्त अडीच रुपये होते. या  दीडएकशे किलोमीटरच्या प्रवासात ज्या गावांमधून एसटी जायची त्या गावांमध्ये लोक मोठी गर्दी करत होते. गावागावांमध्ये लोक बसचे जल्लोषात स्वागत करत. गावागावात सुहासिनी ताट घेऊन उभ्या राहायच्या आणि पूजा करायच्या.

वाहनांद्वारे सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची सुरुवात महाराष्ट्रात 1932 च्या सुमारास खासगी व्यावसायिकांद्वारे सुरु झाली. त्यापुढच्या आठ दहा वर्षात या वाहतुकीचे नियमन करण्याची गरज भासू लागली. 1947 मध्ये भारतातील ब्रिटिशांची राजवट संपुष्टात आली. स्वतंत्र भारताच्या मुंबई प्रांतात 1948 मध्ये बाँबे स्टेट रोड ट्रांसपोर्ट कॉपोर्रेशन (बीएसआरटीसी) या नावाने प्रवासी वाहतूक करण्यासाठी सरकारी कंपनी स्थापन करण्यात येऊन प्रवाशांच्या सार्वजनिक वाहतुकीचा (पब्लिक ट्रांसपोर्ट) एकाधिकार या कंपनीला बहाल करण्यात आला.

भाषिक आधारावर राज्य पुनर्रचनेनंतर मुंबई, मध्य प्रांत आणि संपुष्टात आलेल्या निझाम राज्याचा भाग मिळून महाराष्ट्र राज्याची स्थापना करण्यात आली. त्या भागातील वाहतूक सेवा करीत असलेल्या संस्थाही बीएसआरटीसीमध्ये विलीन करून नव्या महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ (एमएसआरटीसी) या नावाने महामंडळाचा कारभार सुरु राहिला. मध्यवर्ती कार्यालय महाराष्ट्र वाहतूक भवन, डॉ.आनंदराव नायर मार्ग, मुंबई सेंट्रल येथे असून  मुंबई, पुणे, नाशिक, औरंगाबाद,  अमरावती या सहा विभागीय कार्यालयांमार्फत एस.टी.चा कारभार चालवला जातो.

आज एसटीकडे 1 लक्ष 7 हजार  कर्मचारी  आहेत. एसटी महामंडळात एकूण 22 कर्मचारी संघटना अस्तित्वात आहेत. श्रमिक संघ मान्यता व अनुचित प्रथा प्रतिबंध कायदा 1971 नुसार एसटी कामगार संघटना या संघटनेला एकमेव मान्यता प्रदान करण्यात आलेली आहे आणि कर्मचार्‍यांचे धोरणात्मक बाबींवर निर्णय घेण्याचा व वेतन करार करताना प्रशासनाशी वाटाघाटी करण्याचा अधिकार या एकाच संघटनेला प्राप्त झालेला आहे. एसटी कर्मचार्‍यांचे वेतन आणि सुविधा हा कायमच कर्मचारी संघटना आणि महामंडळाचे व्यवस्थापन यांच्यात वादाचा मुद्दा राहिलेला आहे.

1 जून 1948 मध्ये तीस आसनक्षमता असलेली बेडफोर्ड कंपनीची पहिली बस रस्त्यावर आली आणि आज एस.टी कडे  वाहतूक सेवेसाठी सुमारे 15 हजार 550 वाहने आहेत त्यांचा तपशील असा

साध्या बसगाड्या – 14,022

शहर बस गाड्या – 651

निम आराम बसगाड्या – 544

मिनी बसगाड्या – 199

डीलक्स बसगाड्या – 48

वातानुकूलित बसगाड्या – 26

मिडी गाड्या – 10

शिवशाही – 500 + 1500 भाड्याच्या.

एसटीची सेवा गाव तेथे एसटी, रस्ता तेथे एसटी या ब्रिदवाक्यानुरूप खेड्यापासून शहरापर्यंत विस्तारलेली आहे. महाराष्ट्रात एकूण 31 विभागातून एसटीचे विभागीय कामकाज पूर्ण केले जाते. त्याचप्रमाणे आंतरराज्यीय सेवा एसटी महामंडळाकडून पुरविली जाते. गुजरात, मध्य प्रदेश, कर्नाटक, आंध्र प्रदेश, तेलंगणा व गोवा इ. राज्यात विस्तार झालेला आहे.

महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी वर्गासाठी हक्काचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय.

एसटीने कालानुरूप सेवेत बदल केला आहे. साध्या गाड्या निमआराम बसगाड्यांसोबतच नव्या काळात आधुनिक सेवाही एसटीने सुरू केल्या आहेत. डिसेंबर 2002 मध्ये दादर-पुणे मार्गावर अश्वमेध या नावाने वातानुकूलित बससेवा सुरू करून एसटीने आणखी एक पाऊल पुढे टाकले. शिवनेरी, अश्वमेध आणि शीतल या तीन प्रकारच्या वातानुकूलित आराम सेवा एसटी चालवित आहे. प्रामुख्याने महाराष्ट्रातील महानगरांदरम्यान या सेवा चालवल्या जातात. एसटीची आगाऊ तिकीट विक्री सेवा एजंटांमार्फत सुरू करण्यात आली आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या  डिजिटल इंडिया  आवाहनाला प्रतिसाद देऊन स्वतःच्या संकेतस्थळावरून आगाऊ तिकीट विक्रीची सुविधा सुरू करून  एसटीने एक पाऊल पुढे टाकले. मोबाईल अ‍ॅपही उपलब्ध करून देऊन त्याद्वारे आगाऊ आरक्षणाची सुविधा उपलब्ध करून देण्यात आली आहे. बस प्रवासादरम्यान प्रवाशांच्या मनोरंजनासाठी अनेक मार्गांवर मोफत वायफाय सेवा उपलब्ध करून देण्यात आली असून त्याद्वारे मनोरंजनाचे निवडक कार्यक्रम पाहता येतात. तसेच 2017 पासून महामंडळाने ’शिवशाही’या नव्या आसन व शयनयान श्रेणीतील बसेस ताफ्यात आणल्या आहेत. महाराष्ट्र राज्यातील सर्वसामान्य लोकांना खेड्यापासून ते शहरापर्यंत जोडणारी एसटीची सेवा ही एक सामाजिक बांधिलकी निर्माण करणारी सेवा आहे. अनेक पाडे आणि खेड्यापासून शाळेत जाण्यासाठी विद्यार्थी, खेळाडू , ज्येष्ठ नागरिक आणि अपंग यांना सवलतीत प्रवासाची सोय,  आजारी व्यक्तींना खेड्यापासून तालुका आणि जिल्हा रुग्णालयात जाण्यासाठी हक्काचे आणि सुरक्षित प्रवासाचे वाहन म्हणजे आपली एसटी होय. सामाजिक जबाबदारी म्हणून प्रत्येक नागरिकांचे कर्तव्य आहे की आपला प्रवास फक्त एसटी बसनेच करावा व एसटी बसची स्वच्छता राखण्यास मदत करावी.

-नितिन देशमुख

Check Also

रायगडच्या सर्वांगीण विकासासाठी शेकाप महाविकास आघाडीचा पराभव करा

भाजप प्रदेशाध्यक्ष रवींद्र चव्हाण यांचे आवाहन पनवेल : रामप्रहर वृत्तदेवाभाऊंच्या दूरदृष्टीतून शिक्षण, प्रकल्प, रोजगार, विकास …

Leave a Reply