न्यूयॉर्क, ओस्लो : वृत्तसंस्था
कोरोनामुळे जनजीवन ढवळून निघाले असून, जगभरातील अनेक क्रीडा स्पर्धा रद्द करण्यात आल्या. कोरोनाचा क्रीडा क्षेत्राला मोठा फटका बसला असताना या विषाणूवर पूर्ण नियंत्रण मिळवेपर्यंत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये, अशी मागणी अमेरिका आणि नॉर्वेने केली आहे. त्यांनी याबाबत आंतरराष्ट्रीय ऑलिम्पिक समिती (आयओसी)चे लक्ष वेधले आहे.
नॉर्वेच्या ऑलिम्पिक समितीने यासंदर्भात आयओसीचे अध्यक्ष थॉमस बाक यांना पत्र लिहिले. या पत्रावर देशाच्या ऑलिम्पिक समितीच्या अध्यक्ष आणि महासचिवाची स्वाक्षरी आहे. पत्रात त्यांनी लिहिले, आहे की, कोरोनामुळे निर्माण झालेल्या परिस्थितीवर जागतिक स्तरावर मात करण्याची धडपड सुरू आहे. परिस्थिती पूर्णपणे नियंत्रणात येईपर्यंत टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन करण्यात येऊ नये असा आमचा आग्रह असेल.
आम्ही देशातील तसेच आंतरराष्ट्रीय स्तरावरील जनतेच्या आरोग्याबाबत चिंताग्रस्त आहोत. खेळाडूंसाठी ही आव्हानात्मक वेळ आहे. सर्वच देशांनी क्रीडा आयोजन आणि सराव तसेच तयारीदेखील स्थगित केली आहे. अशावेळी ऑलिम्पिकचा विचार करणे योग्य होणार नाही, असेही पत्रात म्हटले आहे.
दुसरीकडे अमेरिकेच्या जलतरण महासंघाने अमेरिकन ऑलिम्पिक आणि पॅरालिम्पिक समितीमार्फत टोकियो ऑलिम्पिक स्थगित करण्याची आयओसीकडे मागणी केली आहे. अमेरिकेच्या ऑलिम्पिक समितीचे सीईओ सारा हिर्शलॅन्ड यांना पाठविलेल्या विनंती पत्रात जलतरण महासंघाचे सीईओ टिम हिचे यांनी कोरोनामुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन किमान वर्षभर लांबवीवर टाकण्यात यावे, अशी मागणी केली आहे. मायकेल फेल्प्स याला 28 पदके मिळवून देणारे कोच बॉब बोमॅन यांनीदेखील ऑलिम्पिक स्थगित करण्याची मागणी केली. खेळाडूंची कामगिरीच नव्हे, तर त्यांची मानसिक स्थिती लक्षात घेता ऑलिम्पिकला स्थगिती देणे हा सर्वोत्तम पर्याय असल्याचे बोमॅन यांनी म्हटले आहे.
फ्रान्सच्या जलतरण संघटनाही स्पर्धेबाबत प्रतिकूलपॅरिस : फ्रान्सच्या जलतरण महासंघानेदेखील कोरोना व्हायरमुळे टोकियो ऑलिम्पिकचे आयोजन स्थगित करण्याच्या मागणीला पाठिंबा दर्शविला आहे. फ्रान्सच्या जलतरण महासंघाने आपल्या कार्यकारी समितीसोबत व्हिडिओ कॉन्फरन्स केल्यानंतर सध्याची स्थिती ऑलिम्पिक आयोजनास अनुकूल नसल्याचे म्हटले आहे. ऑलिम्पिक आयोजन स्थगित करण्याबाबत विचार व्हायला हवा, असेही निवेदनात म्हटले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper