उरण : वार्ताहर
उरण नगर परिषदेने ओल्या कचर्यावर आधारित बायोगॅस प्रकल्प उभारून त्यावर वीजनिर्मिती करण्याचा महत्त्वाचा प्रकल्प कार्यान्वित केला आहे. यामुळे शहरातील कचरा प्रश्न मार्गी लागणार आहे. तसेच नगरपालिकेचे वीज बीलाचे पैसे ही वाचणार आहेत. उरण नगरपालिकेला आपले स्वतःचे डम्पिंग ग्राऊंड नसल्याने कचर्याची विल्हेवाट कशी लावावी? हा प्रश्न सतावत होता. या विवंचनेत असताना नगराध्यक्षा सायली म्हात्रे आणि नगरसेवक यांनी या कचर्यावर प्रक्रिया करून निर्माण होणार्या बायोगॅसवर वीजनिर्मिती करण्याची संकल्पना मांडली. त्यामाध्यमातून येथील कचर्याची समस्याही मार्गी लागेल आणि वीजही मिळेल, असा तोडगा काढण्यात आला. स्वच्छ भारत अभियानांतर्गत कचर्याची समस्या मार्गी लावण्यासाठी प्रस्ताव मंजूर करण्यात आला. त्यासाठी 35 लाखांचा निधीही मंजूर झाला. त्यानंतर खर्या अर्थाने कामाला सुरुवात झाली. आज सर्व अडचणींना तोंड देत हा प्रकल्प पूर्ण करण्यात आला आहे. त्यावर वीजनिर्मितीला सुरुवात झाली आहे. या बायोगॅस प्रकल्पासाठी दिवसाला एक टन ओला कचरा जमा होत आहे. आमिर खान यांच्या सत्यमेव जयते या कार्यक्रमातून प्रेरणा घेत नगरपालिकेच्या माध्यमातून या प्रकल्पाला सुरूवात केली. या माध्यमातून वीजनिर्मिती होऊन एका तासाला 50 युनिट एवढी वीज निर्मिती होत आहे. या वीजनिर्मितीवर नगरपालिकेच्या कार्यालयातील संपूर्ण दिवे वापरात येत आहे. दोन वातानुकूलित यंत्रणाही लावल्या जात आहेत. याकामी नगराध्यक्ष सायली म्हात्रे, उपनगराध्यक्ष जयविन कोळी, गटनेते नगरसेवक रवी भोईर, नगरसेवक कौशिक शाह, आरोग्य सभापती जस्मिन गॅस, नगरसेवक, नगरसेविका, कर्मचारी यांचे सहकार्य मिळत आहे.
ओल्या कचर्याच्या बायोगॅस प्रकल्पावर वीजनिर्मिती करण्यात यशस्वी झालो आहोत. त्यामुळे कचर्याचा प्रश्न मार्गी लागत आहे. सुका कचराही वेगळा करून त्याचीही विल्हेवाट लावली जात आहे. आम्हाला नागरिकांच्या सहकार्याची अपेक्षा असून यापुढे असेच विविध प्रकल्प राबवले जाणार आहे.
-सायली म्हात्रे, नगराध्यक्ष, उरण नगर परिषद
वीजनिर्मितीमुळे वीज बीलाच्या रकमेची बचत होणार आहे. या बायोग्यास टाकीची क्षमता पाच टनाची आहे, पण आपण तीन टनच ओल्या कचर्यापासून वीजनिर्मिती करत आहोत. गरजेपेक्षा जास्त वीज निर्मिती होत असल्याने, आमचा भविष्यातील मानस आहे की, रस्यावरील पथ दिवे ही या वीजेपासून उजळवायचे, त्यामुळे तेथील वीज बीलाची ही बचत होणार आहे. तसेच सुक्या कचर्याची ही विल्हेवाट लावण्यात येणार आहे.
-संतोष माळी, मुख्याधिकारी, उरण नगर परिषद
RamPrahar – The Panvel Daily Paper