Breaking News

कर्जतचा कायापालट करण्यासाठी प्रयत्नशील

शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांचे आश्वासन

कर्जत ः प्रतिनिधी

कर्जत तालुक्यात आमदार महेंद्र थोरवे यांनी विकासाची गंगा आणली आहे. कर्जतचा कायापालट करण्यासाठी आम्ही प्रयत्नशील आहोत. काम करणार्‍यांवरच टीका होते. ती झालीही पाहिजे कारण त्यामधूनच आपण आपल्या चुका दुरूस्त करून पुढे यशस्वी वाटचाल करू शकतो, असे प्रतिपादन शालेय शिक्षणमंत्री दीपक केसरकर यांनी येथे केले. इंटरनॅशनल वैश्य फेडरेशन, महामना मालविय मिशन मुंबई, वैश्य सभा मुंबई, एबिएन टेक्नॉलॉजी ट्रिनिटी एड्स फाउंडेशन व साई मेहेर सेंटर यांच्या संयुक्त विद्यमाने तालुक्यातील वदप प्राथमिक शाळेच्या प्रांगणात मोफत आरोग्य तपासणी व औषधोपचार शिबिर झाले. या वेळी आमदार महेंद्र थोरवे, ज्येष्ठ कला दिग्दर्शक नितीन देसाई, तहसीलदार शीतल रसाळ, शिक्षणाधिकारी पुनिता गुरव, गटशिक्षण अधिकारी सुरेखा हिरवे, डॉ. अजय नकाशे, के. के. नोहरिया, अशोक भोपतराव, मधुकर घारे, संभाजी जगताप आदी उपस्थित होते. आमदार महेंद्र थोरवे यांनी, कर्जत तालुक्याचा कायापालट करण्याचा माझा संकल्प असून त्यासाठी निधीची कमतरता पडू देणार नाही, असा शब्द दिला. या वेळी प्रगतशील शेतकरी निलिकेश दळवी व नैनिश दळवी या बंधूंचा तसेच 103 वेळा रक्तदान करणार्‍या सार्वजनिक रक्तदाते राजाभाऊ कोठारी यांचा मंत्री महोदयांच्या हस्ते सत्कार करण्यात आला. शिबिरात 650 रुग्णांची तपासणी करून त्यांना मोफत औषधे देण्यात आली. यामध्ये 90 जणांची नेत्र तपासणी करण्यात आली. त्यातील 35 जणांना मोतीबिंदू झाल्याचे निदर्शनास आले. त्यापैकी 20 जणांना मोतीबिंदू शस्त्रक्रिया करण्यासाठी पुण्याच्या एच. व्ही. देसाई हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले. 177 रुग्णांना मोफत चष्मे वाटप करण्यात आले. टाटा मेमोरियल हॉस्पिटलच्या कर्करोग तज्ज्ञांनी 153 महिलांची व 81 पुरुषांची तपासणी  केली.

Check Also

उपमुख्यमंत्री अजित पवार यांना पनवेलमध्ये श्रद्धांजली

पनवेल : रामप्रहर वृत्तराज्याचे उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे नेते अजित पवार यांचे बुधवारी (दि. …

Leave a Reply