नवजात बालकाचा उपचारादरम्यान मृत्यू
कर्जत : बातमीदार
तालुक्यातील वदप गावाशेजारी एक दिवसीय स्त्री जातीचे अर्भक टाकून दिल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला असून, या बाळाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
कर्जत तालुक्यातील वदप गावातील आदिवासी वाडीजवळ पडीक भिंतीच्या शेजारील झुडपात मंगळवारी एक दिवसीय स्त्री जातीचे अर्भक गोणपाटाच्या पिशवीत गुंडाळलेल्या स्थितीत स्थानिक ग्रामस्थांना आढळून आले. ग्रामस्थांनी लागलीच त्याची माहिती कर्जत पोलिसांना दिली. पोलिसांनी घटनास्थळी जावून त्या नवजात बालकाला प्रथम कर्जत उपजिल्हा रुग्णालयात आणले, मात्र डॉक्टरांनी त्याला पुढील उपचारासाठी उल्हासनगर येथील सेंट्रल रुग्णालयात हलवले होते. तेथे उपचारादरम्यान या नवजात बालकाचा मृत्यू झाला.
या प्रकरणी अज्ञात माता, पित्याच्या विरोधात कर्जत पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला असून, याबाबत कोणाला काही माहिती मिळाली तर ती पोलिसांना सांगण्याचे आवाहन पोलीस निरीक्षक सुवर्णा पत्की यांनी केले आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper