कर्जत : प्रतिनिधी
भाजीपाला घेण्यासाठी कर्जत बाजारपेठेत होणार्या गर्दीमुळे कोरोना संसर्ग होण्याचा धोका असल्याने येथील भाजी व फळे तसेच अन्य विक्रेत्यांना सोमवार (दि. 19) पासून शहरातील पोलीस मैदानात बसण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. त्यामुळे बाजारपेठेतील गर्दी कमी झाली आहे.
कर्जत बाजारपेठेत मोठ्या प्रमाणात भाजी व फळ विक्रेते रस्त्याच्या दुतर्फा बसतात. त्यामुळे नागरिक बाजारपेठेत खरेदीसाठी मोठ्या संख्येने गर्दी करतात. या गर्दीमुळे कोरोनाचा संसर्ग होऊ शकतो. रायगड जिल्हा पोलीस अधीक्षकांच्या सूचनेनुसार बाजारपेठेतील भाजी, फळ अन्य विक्रेत्यांना नगर परिषद प्रशासनाने शहरातील पोलीस मैदानात बसण्यासाठी व्यवस्था करून दिली आहे. रोज सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत त्यांनी विक्री करावी, अशा सूचना विक्रेत्यांना देण्यात आल्या आहेत.
पोलीस मैदानात व्यवस्था करूनही काही भाजी व फळ विक्रेत्यांनी सोमवारी सकाळी बाजारपेठेत दुकाने थाटली होती. मात्र नगराध्यक्ष सुवर्णा जोशी, उपनगराध्यक्ष अशोक ओसवाल, नगरसेविका स्वामींनी मांजरे यांनी बाजारपेठेत जाऊन त्यांना समज दिली व आपली दुकाने पोलीस मैदानात हलवावीत, असेही सांगितले. या सुविधेमुळे आज बाजारपेठेत गर्दी नव्हती तसेच वाहने येत नसल्याने वाहतूक कोंडीसुद्धा नव्हती.
दररोज सकाळी सात ते रात्री आठ वाजेपर्यंत पोलीस मैदानात भाजी व फळ विक्रेत्यांना दुकाने लावण्यास मुभा दिली असली तरी त्यांनी शासकीय नियम पाळणे आवश्यक आहे.
-सुवर्णा जोशी, नगराध्यक्ष, कर्जत
RamPrahar – The Panvel Daily Paper