
कडाव : प्रतिनिधी
तहसील कार्यालयात विद्यार्थी, नागरिक आणि शेतकरी यांची महत्वाची कामे असतात. मात्र कर्जत तहसिलदार कार्यालयाचे पटांगण म्हणजे खासगी वाहनांची पार्किंग झाल्याचे चित्र पाहावयास मिळत आहे. त्याविषयी नागरिकांमधून तीव्र नाराजी व्यक्त होत आहे.
कर्जत तहसिल कार्यालयाच्या पटांगणात खाजगी वाहनांची गर्दी येथे नक्की कशासाठी येते. हे मात्र गुलदस्त्यातच आहे असे काही सर्वसामान्य नागरीकांकडून बोलले जात आहे. तर, कर्जत तहसिलमधील महसूल विभागाबरोबर काही एजंट लोकांचे अत्यंत अर्थिक घनिष्ठ संबंध असल्याने ते आपल्या खाजगी गाड्यांचे पार्किंग बिनधास्तपणे कार्यालयाच्या गेटच्या आतमध्ये तहसिलदारांच्या आदेशाची पायमल्ली करुन लावत आहेत. त्यामुळे येथे नक्की नजर कोणाची आहे की, नाही हा प्रश्न इथे उपस्थित झाला आहे.
रायगड जिल्ह्यातील कर्जत तालुक्यातील कर्जत तहसील कार्यालय ही एक पुरातन ऐतिहासिक वास्तु असल्याने येथे तालुक्यातील सर्व शासकीय कामांची हालचाल येथूनच होते. महसुल विभागाशी संबंधित काम, जमीन खरेदी- विक्री व्यवहार, मुलांना लागणारे सर्व प्रकारचे दाखले, आणि पोलिस कस्टडी ही याच ठिकाणी आहे. त्यामुळे हे ठिकाण नेहमीं रहदारीने गजबजलेले असत. तहसील कार्यालयात जाण्यासाठी प्रथम एक गेट आहे. त्यानंतर आत मध्ये असलेल्या छोट्या आवारात फक्त एक शासकीय गाडी अर्थात तहसिलदारांची गाडी उभी ठेवली जाते. परंतु, आज जर हे चित्र पाहिलं तर येथे मोठ्या प्रमाणात खाजगी गाड्या गाड्यांची रहदारी असल्याचे पाहवयास मिळते. त्यामुळे तालुक्यातील विविध भागांतून आलेल्या नागरिकांना येथे मोकळ्या जागेवर उभे राहता येत नाही. कर्जतचे तहसीलदार विक्रम देशमुख यांनी खासगी वाहनांना बंदी केली असताना सुद्धा आतमध्ये या गाड्या येतातच कशा असा प्रश्न उपस्थित राहिले आहे. त्यामुळे कर्जत तहसीलदार अशा खासगी वाहनांवर कारवाई करणार का असा सवाल विद्यार्थीवर्ग आणि नागरिकांकडून उपस्थित केला जात आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper