कर्जत : बातमीदार
कर्जत तालुक्यात रविवारी (दि. 14) कोरोनाचे 11 रुग्ण आढळून आले. यामध्ये पोलीस अधिकार्यांसह खासगी डॉक्टरचा समावेश असल्याने खळबळ उडाली आहे. वाढत्या रुग्णांमुळे कर्जत तालुका अर्धशतकाकडे वाटचाल करीत आहे.
कर्जत तालुक्यातून नोकरीसाठी मुंबई आणि अन्य भागात जाणार्यांची संख्या मोठी आहे. त्यातील काहींना कोरोनाची लागण झाली असून, त्यांच्या संपर्कात आलेले आणि दररोज प्रवास करणारे यांना कोरोनाचा संसर्ग होताना दिसत आहे. दोन दिवसांपूर्वी कर्जत तालुक्यातील वैजनाथ येथील एका 31 वर्षीय विवाहितेचा मृत्यू झाला होता. त्यानंतर या महिलेच्या संपर्कात आलेला तिचा 35 वर्षीय पती आणि 53 वर्षीय सासू यांचे कोरोना टेस्टचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. दुसरीकडे सावळे येथील पोलीस कोठडीत असलेल्या 25 वर्षीय आरोपीची कोरोना टेस्ट पॉझिटिव्ह आली होती आणि त्यानंतर या आरोपीच्या संपर्कात आलेल्या कर्जत पोलीस ठाण्यातील 37 वर्षीय शिपायाची टेस्ट पॉझिटिव्ह आली होती. खबरदारीचा उपाय म्हणून कर्जत पोलिसांनी सावळे येथील आरोपींची हाताळणी करणार्या 15 पोलिसांच्या कोरोना टेस्ट केल्या होत्या. त्यात या गुन्ह्याचे तपास अधिकारी असलेल्या पोलीस उपनिरीक्षकाला कोरोनाची लागण झाली आहे. याशिवाय कर्जत पोलीस ठाण्यात सेवेत असलेल्या एका शिपायाचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. अशा प्रकारे कर्जत पोलीस ठाण्यातील तिघांना कोरोनाने ग्रासले आहे.ममदापूर येथे राहणार्या आणि मुंबईत काम करीत असलेल्या 35 वर्षीय तरुणाला कोरोना झाला होता. या तरुणाच्या संपर्कात आलेल्या पाच जणांच्या कोरोना टेस्ट आरोग्य विभागाने केल्या होत्या आणि त्या पाचही पॉझिटिव्ह आल्या आहेत. त्यात 11 जून रोजी पॉझिटिव्ह आलेल्या तरुणाला तपासणारे नेरळ खांडा भागातील 38 वर्षीय डॉक्टर तसेच या तरुणाला घेऊन जाणारा नेरळजवळील भडवळ गावातील 38 वर्षीय रिक्षाचालकासह तरुणाची 31 वर्षीय पत्नी, 75 वर्षीय वडील आणि आठ वर्षांचा मुलगा अशा पाच जणांना कोरोनाने ग्रासले आहे. या सर्वांचे अहवाल पॉझिटिव्ह आल्यानंतर नेरळ परिसरात खळबळ माजली आहे.कारण नेरळ खांडा विभागातील कोरोना पॉझिटिव्ह डॉक्टरने तीन दिवसांत तब्बल 200 रुग्णांची तपासणी केली आहे.
RamPrahar – The Panvel Daily Paper