पनवेल ः रामप्रहर वृत्त
राज्यातील गोरगरीब, उपेक्षित, वंचित बहुजनांच्या शैक्षणिक प्रगतीची अध्वर्यु असलेल्या आणि आशिया खंडातील अव्वल दर्जाची एकमेवाद्वितीय असलेल्या रयत शिक्षण संस्थेचा स्थापनेचा शताब्दी महोत्सव साजरा होत असताना पद्मभूषण डॉ. कर्मवीर भाऊराव पाटील आणि सौ. लक्ष्मी वहिनींच्या असीम त्यागाने तमाम बहुजनांच्या भावना ओथंबलेल्या असून कर्मवीरांचे दूरदर्शी शैक्षणिक कार्य 100व्या वर्षीही अव्याहतपणे चालू असल्याचे प्रतिपादन सागर रंधवे यांनी केले.
विद्यालयाच्या प्रांगणात रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेला 100 वर्षे पूर्ण झाल्याबद्दल, तसेच विद्यालयात गत वर्षभरात सांस्कृतिक विभागाच्या वतीने राबविण्यात आलेल्या शताब्दी महोत्सवाच्या सांगता समारंभानिमित्त आयोजित कार्यक्रमात बोलताना रंधवे यांनी कर्मवीरांच्या जीवनातील निवडक प्रसंगांसह संस्थेच्या स्थापनेची पार्श्वभूमी विषद केली.
संस्थेच्या व अण्णांच्या जयजयकाराच्या घोषणांनी शताब्दी महोत्सवाचा जल्लोष करण्यात आला.विद्यालयाच्या गायक वृंदाने कर्मवीर स्तवन सादर केले. या वेळी उपमुख्याध्यापक राजकुमार चौरे, पर्यवेक्षक दीपक भर्णुके, रयत बँकेचे संचालक प्रमोद कोळी, लॅबप्रमुख रवींद्र भोईर, गुरुकुल प्रमुख संदीप भोईर, इतर सर्व रयत सेवक व विद्यार्थी उपस्थित होते. ज्योत्स्ना ठाकूर यांनी प्रास्ताविक व सूत्रसंचालन केले.
RamPrahar – The Panvel Daily Paper