किशोर गट जिल्हा अजिंक्यपद कबड्डी स्पर्धा
पाली : प्रतिनिधी
कबड्डीची पंढरी म्हणून ओळख असलेल्या रायगडच्या मातीत सुधागड तालुक्यातील नांदगाव हायस्कूलच्या प्रांगणात जिल्हा अजिंक्यपद स्पर्धेचा दम घुमला. रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनच्या मान्यतेने व सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनच्या सहकार्याने झालेल्या या किशोर गट स्पर्धेत मुलींमध्ये राजमाता जिजाऊ कळंबोली आणि मुलांमध्ये जय बजरंग रोहा या संघांनी विजेतेपद पटकाविले.
श्री काळभैरव क्रीडा मंडळ नांदगाव-मुंबई-ठाणे यांच्यातर्फे आयोजित या स्पर्धेत मुलींच्या 16 आणि मुलांच्या 48 अशा एकूण 64 संघांनी सहभाग घेतला होता. यामध्ये मुलींमध्ये द्वितीय पनवेल, तृतीय भालचंद्र उरण व चतुर्थ क्रमांक टाकादेवी मांडवा या संघाने प्राप्त केला, तर मुलांमध्ये द्वितीय क्रमांक बालयुवक पेझारी, तृतीय नवजीवन क्रीडा मंडळ पेझारी व चतुर्थ जय हनुमान क्रीडा मंडळ उचेडे-पेण या संघाने मिळविला. प्रथम क्रमांक विजेत्या संघांना कै. कु. अभिषेक बोरकर फिरता स्मृतिचषक देऊन गौरविण्यात आले.
स्पर्धेच्या उद्घाटन व बक्षीस वितरण कार्यक्रमाला रायगड जिल्हा कबड्डी असोसिएशनचे उपाध्यक्ष सुरेश खैरे, हिराचंद पाटील, गजानन मोकल, सहकार्यवाह जे. जे. पाटील, संजय मोकल, छत्रपती पुरस्कार प्राप्त सूर्यकांत ठाकूर, प्रमोद म्हात्रे, प्रो कबड्डी पंच सुहास पाटील, आंतरराष्ट्रीय पंच रवींद्र म्हात्रे, उद्योजक दीपक मेहता, चिमाजी कोकाटे, अरिफ मनियार, सरपंच सोनल ठकोरे, उमेश यादव, माजी उपसरपंच नरेश खाडे, सुधागड तालुका कबड्डी असोसिएशनचे अध्यक्ष राजेंद्र राऊत, सुधागड तालुका मराठा समाज अध्यक्ष गणपत सितापराव, पेणचे सभापती गायकर, माजी सभापती साक्षी दिघे, जीवन साजेकर, भगवान शिंदे आदींसह नांदगाव पंचक्रोशीसह जिल्ह्यातील कबड्डीप्रेमी उपस्थित होते.
RamPrahar – The Panvel Daily Paper